Followers

शनिवार, एप्रिल २३, २०२२

योद्धा!

वाटतं तितकं सोपं नाही
योद्धा बनून जगणं...
सा-या स्वप्नांना बाजूला सारून
एकनिष्ठ होऊन देशासाठी लढणं...

आई,बाबा,पत्नी, मुलं
सुखदुःखात सारेच बघतात वाट
कुणाच्या होतील अपेक्षा पूर्ण
लढता लढता संपतो जीवनघाट

व्हावे सैनिकासारखा योद्धा
त्याग असे त्याचा महान
मायभूच्या रक्षणासाठी
करितो प्राणाचे बलिदान

वंदन करिते मी ...
योद्ध्यासी  कृतज्ञ होऊन
दोन्ही सुपूत्र भारतभूचे
जय जवान जय किसान!🙏

©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"

बुधवार, एप्रिल २०, २०२२

सिक्रेट मिशन !

सिक्रेट मिशन आहे हो...
माझं अन् कुलदेवतेचं खास
माझ्या कुटुंबासाठी राहते ती दक्ष
वर्षाव करते आनंद मोतींची रास !

जेथे जाते मी तेथे असते 
कुलदेवता माझ्या सांगाती
करिते मी सेवा सदैव भक्तीभावे 
लेक मी अन् ती आई सुंदर नाती !

©® पुष्पा पटेल " पुष्पम् "

सोमवार, एप्रिल १८, २०२२

निसर्ग गुरू

निसर्गाचा सहवासात 
रमते मी हो फार
आनंद मिळे मज
मन होई गारेगार

निसर्ग गुरूचा शाळेत
नोंदवू या आपले नाव
तिथे मिळालेल्या ज्ञानाने
आयुष्याचा वाढेल भाव

निसर्ग गुरू शिकवी
त्याग आणि समर्पण
सत्य शाश्वत घेऊनी हाती
विश्वची करू आनंदवन!

©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"

मंगळवार, एप्रिल १२, २०२२

ज्ञानसूर्य !

‌समाजसुधारकाचे व्रत घेतले
निश्चयाने दोहोंनी हाती
अज्ञानाच्या तिमिरात चमकले
ज्ञानसूर्य होऊन सावित्री-ज्योती

सावित्रीच्या हस्ते रचली
स्री-शिक्षणाची मुहूर्तमेढ
सनातनींंना न घाबरता
मोडीली कर्मठतेची तेढ

रांधा वाढा उष्टी काढा 
तोडिल्या परंपरेच्या भींती
ज्ञानार्जनाचा वसा घेऊन
लेकींना दिली अक्षर नीति

ज्योती-सावित्रीच्या कष्टातून
फुलले अनंत ज्ञानाचे मळे
वाहते मी आज कृतज्ञतेने
कोटी कोटी पुष्पांची दळे

सत्यशोधक, महान समाज
 सुधारक ज्योतीबा फुलेंना
🙏🌹शतकोटी प्रणाम ! 🌹🙏

©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"
   मु.पो.म्हसावद

मंगळवार, एप्रिल ०५, २०२२

आयुष्याचे गणित!

आयुष्याचे गणित असे सहज सोडवत जावे
जीवनगाणे आपुले आनंदी मनाने गातंच रहावे

सुविचार आणि सदाचार यांची करावी बेरीज 
जगावं मस्त आनंदी, कुविचार अन् द्वेशा खेरीज

दुःखाला भागून सुखाला गुणावं अंतरी
अन् फक्त पदरी बांधावी अनुभवांची शिदोरी

आयुष्याचा वहीची पानं लिहावी सुखसमाधानात
राहू द्यावे ते गणित शाळेचाच दप्तरात

नवीन को-या पानावर रोज चित्र रेखाटावं छान
रंग उधळावे सप्तरंगी जणू मैफीलीत ओढावी सुरेख सप्तसुरांची तान!

©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"

रविवार, एप्रिल ०३, २०२२

माझा अभिमान!

माझा अहोंचा मला नेहमीच
वाटतो खूप खूप अभिमान

शून्यातून विश्व निर्माण केले
दिलं कुटुंबाला स्थैर्य,सुख,समाधान

स्वतः मौजमजा कधी केली नाही
देवावर श्रद्धा ठेवून कष्टाने मिळवले सारेकाही

"काम करायची लाज बाळगू नये कधी"
हा संस्कार दिला आम्हा सर्वात आधी !

" कर्म हिच पूजा " मानून साधते मी परमार्थ
जगदंबे,असू दे कृपा आम्हांवरी इतूकाच हा स्वार्थ! 

©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"

गुरुवार, मार्च ३१, २०२२

बाप भासे विठु माऊली!

स्वतः फाटके कपडे घालून
पायी तुटके चपला घालून 
बाळाचे लाड पुरवितो तो ...बाप !
बाहेरून वाटतो नारळासारखा कठोर
पण् आतून खोब-यासारखा मऊ गोड असतो तो...बाप!
" तू फक्त शिक आणि मोठा हो.
बाकीचे मी बघून घेईन !"असं 
धीराने म्हणणारा ...बाप !
स्वतः मौजमजा विसरून झटतो
मुलाबाळांचा हट्ट पुरवण्यासाठी
जन्मभर राबतो तो ...बाप !
स्वतः पोटाची भूख मारुन
मुलाची भरमसाठ काॅलेज फी भरतो तो... बाप !
प्रसंगी रागावून कोपऱ्यात एकटाच पश्चात्ताप करणारा तो... बाप ! 
मुलीला सुख-संपन्नतेचे सासर मिळावं म्हणून उन्हा-तान्हात भटकंती करणारा तो...बाप !
पाठवणी करतांना " लेक नाही काळजाचा तुकडा हाय! जपा हो तिला!" म्हणून  हात  जोडून व्याही मंडळींना विनंती करणारा तो...बाप !
डोळ्यात रग आणि हृदयात प्रेम जपणारा तो...बाप ! 
चंदनासारखा झिजून कुटुंबावरी मायेचे सुगंधी लिंपन करतो तो... बाप 
बाप तोलतो घराचा भार !
बाप असतो घराचा आधार !
बाप असतो दिलाने उदार
संकटे कितीही येवो होत नाही  लाचार तो...बाप !
बाप...वटवृक्षाची सावली 
बापातच दिसते मला विठाई माऊली !

©® पुष्पा पटेल " पुष्पम् "
        मु.पो.म्हसावद

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल