Followers

सोमवार, फेब्रुवारी २१, २०२२

अशी मी घडले !



     

प्रथमतः मी माझ्या जन्मदात्या आई बाबाची आजन्म ऋणी राहील.मला घडवण्यात त्यांनी खूप कष्ट घेतले.त्यानंतर मी ऋणी राहील या समाजाची...! त्याने मला शिकवले की, " एवढंही खरं वागू नको आणि निष्ठावंत राहू नको ;  की , तुझ्या चांगुलपणाच तुझा बळी घेईल." माझ्यावर झालेल्या माणुसकी, विश्वास अन् समर्पण या सुसंस्कारांनी मला खोटं वागायची परवानगी कधीच  दिली नाही.त्यामुळे मला अनेक कडू-गोड अनुभवांना सामोरे जावं लागले.

     मी एका भरल्या घरात जन्म घेतला. आजी-आजोबा म्हणजे संस्कारांचा वटवृक्षच! आणि माया,प्रेम,आपुलकी, जिव्हाळा ही त्यावृक्षाच्या पारंब्या...! मी अशा या महान संस्कारांच्या वटवृक्षाच्या सावलीत छान घडत गेले.

     आईबाबांनी स्वतः खूप कष्ट केले आणि आम्हा भावंडांना दिला समृद्धीचा पाट.

     माझे बाबा नेहमी म्हणतात, " तू समर्थ हो बाळा... मी आहे तुझ्या पाठीशी! हरायचंं तर कधीच नाही...!संकटांशी धैर्याने लढायचं ! " हे त्यांचे -

धीरोदात्त बोल 

माझ्यासाठी आहेत अनमोल! 

     माझ्या आईबाबांची आदर्श विचारसरणी आणि आचरणांची शिदोरी मी हृदयतळी अलगद जपलीय  !  ते आदर्श विचार घेऊन चालतेय मी संसाराची वाट.

     आजी-आजोबा तर माझे जीव की प्राण होते.त्यांचा लाड अन् प्रेमापुढे मला तर आकाशही ठेंगणे वाटे.असं प्रेमानं अन् मायेनं माझं बालपण कधी भूर्रऽकन उडून गेलं ते कळलं सुद्धा नाही.

      दिवसामागून दिवस जात होते.जिद्द आणि चिकाटी ठेऊन संकटांवर मात कशी करावी हे शिकत माझी जीवनाची वाटचाल सुरू होती.

      कुलस्वामिनीचा कृपेने माझं लग्न ठरलं उच्च विद्या विभूषित,

संस्कार संपन्न,संयम,प्रेम, 

सहिष्णुता इ.नी सर्वोत्तम असलेल्या पुरुषोत्तमरावांशी! त्यांची सहचारिणी होऊन मी पुरेशा भौतिक सुविधा नसलेल्या खेडेगाव असलेल्या सासरी आले.

     आम्हा उभयंताच्या अठ्ठावीस वर्षाच्या सहवासात मला समाजाकडून अनेक चांगले-वाईट अनुभव आले. त्यातून मी तावून सुलाखून बाहेर पडले.प्रत्येक वेळी पतीराजेच्या प्रेरणेने संकटाच्या आगीतही बावनकशी सोन्यासारखी लख्ख चकाकत राहिले.ह्यांनीच माझी लेखनाची आवड बघून  मला वेळोवेळी मार्गदर्शन करुन माझ्या लेखन कलेला चालना दिली.आई सरस्वतीचा वरदहस्त आणि ह्यांची साथ यामुळे आज मी झालेय सारस्वत!आणि प्रतिलिपीत,प्रशंसा पत्र , सातपुडा साहित्य मंच, लेवागुजर साहित्यिक मंडळी इत्यादि विविध ग्रुप वर मी सध्या एक साहित्यिक म्हणून वाटचाल करीत आहे.

     अर्थात, तुम्ही सर्व माझे बंधु,भगिनी,मित्र-मैत्रिणी, मार्गदर्शक,समिक्षक ,वाचक म्हणून मला वेळोवेळी स्फूर्ति देतात.तुम्ही सुद्धा माझे लेखनाचे बळ! माझ्या साहित्यिक जडणघडणीत तुम्हाला वेगळे करणे म्हणजे कृतघ्नपणाचेच ठरेल.हे मला कधीच मान्य नाही.


©®सौ.पुष्पा पटेल " पुष्पम् "

  मु.पो. म्हसावद.जि.नंदुरबार.

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल