जन्मदाते ते ऋणाईत मी कशी होऊ उतराई
मला घडविण्या केले कष्ट अपार
काया वाचा मने रिझवूनी केले संस्कार
माणुसकी, विश्वास अन् समर्पण
शिकले मी त्यांचा सावलीत छान
स्वतः काट्याची तुडवली वाट
दिला आम्हा भावंडांना समृद्धीचा पाट
तू समर्थ हो बाळा...मी आहे तुझ्या पाठीशी !
हरायचं नाही कधी...धैर्याने लढ संकटांशी !
हे त्यांचे धीराचे बोल
होऊच शकत नाही त्या शब्दांचे मोल
आहेत न्...ते अनमोल !
आई-बाबांचा आदर्शाची शिदोरी
जपलीय बरं मी हृदयाशी
आजी-आजोबा तर माझे जीव की प्राण
त्यांचा प्रेमापुढे तर गगनही वाटे ठेंगणं
अशा भरल्या घरात जन्म माझा झाला
शिकून खूप मोठी हो आशीर्वाद मज मिळाला.
कुलस्वामिनी कृपेने जुळले संबंध सर्वोत्तम अशा पुरुषोत्तमाशी!
अठ्ठावीस वर्षाच्या सहवासात
मैत्री झाली अक्षरांशी...
समजावली त्यांनी मला
साहित्य...लेखनकला
तन-मन आणि अक्षरधनाशी
जणू बांधली रेशीमगाठ
आज चालतेय मी...साहित्याची अवघड वाट...
भेटली माय माझी सरस्वती ! म्हणाली, घे तू लेखनी हाती
आज तिच्या प्रसादे झाले मी सारस्वत !
जन्मते कविता ! शब्दापुढती अर्थ अर्थासवे घेऊन सूर
कवितेच्या प्रांतात ऐकते मी नाव...
गोड चर्चा होते माझी सर्वदूर !
आई-बाबांचा आठवणी शिवाय माझी उजाडत नाही पहाट
जन्मोजन्मी अशीच घट्ट राहो मातृ-पितृत्व गाठ!
©®सौ. पुष्पा पटेल "पुष्पम्"
मु.पो.म्हसावद.ता.शहादा.
जि.नंदुरबार.