होऊनी देव माझा रंगारी
टाकतो रोज प्रात:काळी
या अंगणात हो माझा
पानाफुलांची सुबक रांगोळी
हे स्वर्गसुख बघतांना
आनंद अनुभवते मी दारी
आली सुख समाधानांची
मला भेटावया भक्तीवारी
भरुन घेते मी डोळ्यात
कुंडीतली शेवंती गुणी
पानापानांत हो बहरली
जाई - जुई चहूबाजूंनी
कोप-यात बघा मोगरा
मिरवतो त्याचाच तोरा
बकुळी मिरवीते शेखी
प्रिय तिला केसांचा गजरा
चोर पाऊले येऊन देतो
सोनचाफा मंद परिमळ
मन मोहवी पुष्करिणी
सूर्य किरणांत श्वेतकमळ
काट्यासोबत राहूनही
सप्तरंगात फुले गुलाब
निराश माझा मनाची
तोच तर राखतो आब
प्रीति आणि भक्तीची
शिकवण देते तुळस
माझे तन मन ठेवी सुदृढ
फिरकू ना देई आळस
माझा फुरसतीचा वेळ
मज वाटे हर्ष पर्वणी
पाने फुले परिमळसंगे
प्रतिदिन मिळे मेजवानी
©® पुष्पा पटेल " पुष्पम् "