Followers

शनिवार, मे २८, २०२२

माझे बालपण!

म्हणतात ना "बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा!"अगदी तसंच माझं बालपण साखरेचा रव्यासारखं खूप खूप गोड होते!
कधीही मला आता कंटाळा आला की तेव्हा आठवते मी माझे गोड, खट्याळ बालपण आणि बालपणीच्या आठवणी! कित्ती मज्जा होती त्यावेळी...ना कसलं काम ना कसली जबाबदारी होती फक्त मी आनंदलहरी!बाबांची होती लाडकी आईची सोनुली तर आज्जी आजोबांची होते मी तान्हुली !काय सांगू तुम्हाला माझी बालपणीची गम्मत सगळ्यांची मी होते लाडकी
मैत्रीणींसोबत खेळ खेळत अल्लडपणे खिदळणे, भातुकलीच्या खेळ नी त्यातले रुसवे फुगवे,अक्षय तृतीया आली की झोपाळा त्यानंतर गौराईचा गोतावळा, कोजागरी पौर्णिमा आली भुलाबाईची गाणी, झिम्मा फुगडी रास,गरबा एकमेकांचा खाऊ ओळखण्याची चढाओढ तसेच रंगपंचमीच्या सप्तरंगात न्हाणे! सगळं कसं अगदी स्वर्ग सुख होतं. अगदी सुख असो की दुःख कधीच मागे नाही राहिलो.सगळ्या मैत्रीणी अगदी जीवाला जीव देणा-या होतो आणि आजही आम्ही सगळ्या मैत्रिणी भेटतो,मोबाईलवर बोलतो तासनतास!
  तसेच आमच्या घरीही आम्ही तिन भावंड मी मोठी त्यानंतर एक बहिण आणि मग लहान भाऊ.
मी मोठी असल्याने मला नेहमीच समजूतदारपणा दाखवावा लागे आणि ती दोघं नेहमी भांडायची पण मला मात्र आज्जी म्हणायची बेटा तू मोठी बहीण आहे त्या दोघांची मग तू घे ना समजून! मला मात्र तेव्हा खूप राग यायचा माझ्या मोठेपणावर.वाटायच़ं,"बाप्पाने मलाच का मोठी बहीण केलं मी सगळ्यात छोटी असते तर कित्ती मज्जा आली असती?"
  तसेच मामाच्या गावाला सुट्टीत ही खूप खूप मजा केली आम्ही.मामेभाऊ, मामेबहीण सगळे भर दुपारी नाना नानी झोपले की गुपचूप  उन्हात पानपिपळी,डबल इस्टोल असे खेळ खेळायला पळायचो.आणि मग नानांना जाग आली की एकमेकांवर यानेच मला खेळायला नेले असं खोटे आरोप करुन वेळ निभावून न्यायचो.कितीही भांडण झाले तरीही रात्री एकाच ताटात आनंदाने जेवायचो.कित्ती निर्मळ होते तेव्हा मन!
बालपण म्हणजे देवाने दिलेली अनमोल भेट असं मला वाटतं.म्हणून मी ते माझ्या हृदयाच्या कोंदणात अगदी अलगदपणे जपून ठेवलं आहे.
 आज एवढंच बस्स🙏

©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"
          ‌म्हसावद

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल