Followers

जीवन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जीवन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, एप्रिल २५, २०२२

सुखी संसार!

सख्या,संसाराचा मांडलाय ना डाव
मग खेळू आपण तो आनंदें

तू जिंकलास तरी डाव आपलाच!
मी जिंकले तरी डाव आपलाच!

पण...त्यात रड मात्र नसावी
अखंड सोबत मला तुझी असावी

सुखदुःखाचा लाटेतही करु
जीवननौका ही आपुली पार 

माहिती रे!सारे हे डाव घडीचे 
पर्वा कुणाची का करावी ?

आपणच एकमेकांना जवळचे!
हाती हात  घेऊन  चालायचे...!

©®सौ. पुष्पा पटेल " पुष्पम् "

मंगळवार, एप्रिल ०५, २०२२

आयुष्याचे गणित!

आयुष्याचे गणित असे सहज सोडवत जावे
जीवनगाणे आपुले आनंदी मनाने गातंच रहावे

सुविचार आणि सदाचार यांची करावी बेरीज 
जगावं मस्त आनंदी, कुविचार अन् द्वेशा खेरीज

दुःखाला भागून सुखाला गुणावं अंतरी
अन् फक्त पदरी बांधावी अनुभवांची शिदोरी

आयुष्याचा वहीची पानं लिहावी सुखसमाधानात
राहू द्यावे ते गणित शाळेचाच दप्तरात

नवीन को-या पानावर रोज चित्र रेखाटावं छान
रंग उधळावे सप्तरंगी जणू मैफीलीत ओढावी सुरेख सप्तसुरांची तान!

©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"

गुरुवार, मार्च १७, २०२२

एक दिवस हवा!

हवा आहे मला एक दिवस स्वतःसाठी
नकोय कसले ओझे माझ्या पाठी
करेन आराम,जाईल मस्त सिनेमाला
जगून तर बघू एक दिवस स्वतःसाठी

एकदिवस कामांना मारेल मी दांडी
मस्त हूंदडून खाईल चटपटीत पाणीपुरी
मैत्रीणींशी गप्पा अन् मनमुराद हसणं
आठवणीत रमून इच्छा होईल पुरी

असा हा मस्त दिवस जगायचाय मला
देवा होईल का रे पूर्ण माझी इच्छा 
तूच कर काहीतरी अन् सोडव पिच्छा
तूच माझा मायबाप दे एक दिवस मज आनंदाचा!

©® सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"

मंगळवार, मार्च १५, २०२२

खरा धर्म!

दुसऱ्यांचा आनंदात माना आनंद

हृदयग्रंथी लिहीत जावे एकेक पर्व

रेऽऽ मनवा जैसी करणी वैसी भरणी

प्रेम अर्पावे सकला हाच खरा धर्म !


यशस्वी जीवनाचा महा मूलमंत्र

निरपेक्ष  भावनेने  करावे  कर्म

प्रामाणिकपणा, आनंद, समाधान

हेच खरे यशस्वी जीवनाचे मर्म !


©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"

बुधवार, फेब्रुवारी १६, २०२२

शिल्प हे जीवनाचे !

आई-बाबा माझे विठ्ठल-रखुमाई
जन्मदाते ते ऋणाईत मी कशी होऊ उतराई
मला घडविण्या केले कष्ट अपार
काया वाचा मने रिझवूनी केले संस्कार
माणुसकी, विश्वास अन् समर्पण
शिकले मी त्यांचा सावलीत छान
स्वतः काट्याची तुडवली वाट
दिला आम्हा भावंडांना समृद्धीचा पाट
तू समर्थ हो बाळा...मी आहे तुझ्या पाठीशी !
हरायचं नाही कधी...धैर्याने लढ संकटांशी !
हे त्यांचे धीराचे बोल
होऊच शकत नाही त्या शब्दांचे मोल
आहेत न्...ते अनमोल !
आई-बाबांचा आदर्शाची शिदोरी
जपलीय बरं मी हृदयाशी
आजी-आजोबा तर माझे जीव की प्राण
त्यांचा प्रेमापुढे तर गगनही वाटे ठेंगणं
अशा भरल्या घरात जन्म माझा झाला
शिकून खूप मोठी हो आशीर्वाद मज मिळाला.
कुलस्वामिनी कृपेने जुळले संबंध सर्वोत्तम अशा पुरुषोत्तमाशी!
अठ्ठावीस वर्षाच्या सहवासात
मैत्री झाली अक्षरांशी...
समजावली त्यांनी मला
साहित्य...लेखनकला
तन-मन आणि अक्षरधनाशी
जणू बांधली रेशीमगाठ
आज चालतेय मी...साहित्याची अवघड वाट...
भेटली माय माझी सरस्वती ! म्हणाली, घे तू लेखनी हाती 
आज तिच्या प्रसादे झाले मी सारस्वत !
जन्मते कविता ! शब्दापुढती अर्थ  अर्थासवे घेऊन सूर 
कवितेच्या प्रांतात ऐकते मी नाव...
गोड चर्चा होते माझी सर्वदूर !
आई-बाबांचा आठवणी शिवाय माझी उजाडत नाही पहाट
जन्मोजन्मी अशीच घट्ट राहो मातृ-पितृत्व गाठ!

©®सौ. पुष्पा पटेल "पुष्पम्"
मु.पो.म्हसावद.ता.शहादा.
जि.नंदुरबार.

रविवार, जानेवारी १६, २०२२

विसरु कशी मी !


गोड स्वप्न पाहिले मी आयुष्याचे
वादळाशी संघर्ष विसरले नाही

आसक्त झाले गुलाबपुष्पावरी मी 
काट्याचे भान विसरले नाही

शिखरावर नाव कोरले आज मी
ऊन-पावसाची संगत विसरले नाही

प्रसन्न वदने याची डोळा पाहिले मी
राधा-मिरेची निर्व्याज भक्ती विसरले नाही


©® पुष्पा पटेल " पुष्पम् "

मंगळवार, जानेवारी ०४, २०२२

कसोटी(शेलचारोळी)

ख-या माणसाला आयुष्यात कधी
कधी  तरी  कसोटी द्यावी लागते !
भिष्म असो किंवा युधिष्ठिर असो
असो ! त्यांच्या पश्चात जग पुजीते!

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

मंगळवार, डिसेंबर २८, २०२१

इवलसं मन

इवलसं मन माझं
घेतय हो उंच भरारी
गगनाला  गवसणी
घालून मारतंय फेरी

इवलसं मन माझं
झालंय फुलपाखरू
बालपणीच्या आठवणीत
रमलं कसं आवरू

इवलसं मन माझं
गेलं एकदा माहेरी
आई-बाबांशी गूज
करुन फिरलं माघारी

इवलसं  मन  माझं
गेलं ' अहो 'च्या ऑफिसात
गर्रऽकन गिरकी मारुन
परत आलं हो  घरात !

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

शनिवार, डिसेंबर १८, २०२१

मोकळा श्वास

संसारात  गुंता सोडवताना
मन  झाले  हो माझे उदास
गुंतून पडणे सोडून दिले मी
आता  घेतेय मोकळा श्वास


© पुष्पा पटेल " पुष्पम् "

गुरुवार, डिसेंबर १६, २०२१

प्रिय शब्दसुमनांनो

माझ्या प्रिय शब्दसुमनांनो...!
तुम्ही असे दूर-दूर राहू नका

तुमचाच आधार आहे मज
हे तुम्ही कधी विसरू नका !

तुमच्या द्वारे मनीचे गुज उतरे
सुख लेखणीचे  हिरावू नका !

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

शनिवार, डिसेंबर ११, २०२१

आनंदे जगू

जीवन फक्त एकदाच मिळते
व्देष  मत्सर  हा बाजूला ठेवू
प्रेमाने  आणि  आनंदाने जगू
राग नको मानवता जागी ठेवू

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

शुक्रवार, डिसेंबर १०, २०२१

मौनंम्


मौनंम्   सर्वार्थ   साधनम् !
म्हटले  समाज  धुरीणांनी
उगीच नाही  हो  ही उक्ती
प्रचलित केली  ती सर्वांनी 

© पुष्पा पटेल " पुष्पम् "


गुरुवार, डिसेंबर ०९, २०२१

सुखी सहजीवनाचे सूत्र

सख्या रे...
तोंडात साखर अन् डोक्यावर बर्फ
ठेवलाय की रे  मी आधीच !
सुखी सहजीवनाचे हे खरे सूत्र
संसारी होत नाही वाद-विवाद
कधीच !

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

मंगळवार, डिसेंबर ०७, २०२१

सवय


कितीदा तुला सांगावे
मला काहीच कळेना
उशिरा उठायची सवय
तुझी जाता जाईना
"लवकर निजे लवकर उठे
त्यासी ज्ञानसंपत्ती भेटे"
हा मंत्र तू अंमलात आणना!

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

रविवार, डिसेंबर ०५, २०२१

सुखाचे वारे

दुःखाचा भागाकार केला
विसरले आहे दुःख  सारे

सुखाचा  क्षण आणलाय
नको आता वेदनेचे पहारे

तुझी कृपा असू द्या साई
दुःखातही वाहतील सुखाचे वारे!

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

शुक्रवार, डिसेंबर ०३, २०२१

खेळ भावनांचा

भावनांचा खेळ सारा
कुठवर खेळशी मना

जगी स्वार्थाचा बाजार
दखल  कुणी घेई ना

आपुलेच निघाले बेईमान
दुस-यासी बोलवेना

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

सोमवार, ऑक्टोबर २५, २०२१

समृद्ध

उदंड   कष्ट  करून  सख्या...
दिला जीवनाला निश्चित साज
मी   ही  केला  संसार  नेटका
म्हणून  समृद्ध आहोत रे आज

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

गुरुवार, ऑक्टोबर १४, २०२१

पाऊस (हायकू )

अरे पाऊसा
चित्त तुझे ठायी रे
दे ना तू ग्वाही!

पिक शेतात
जातंय करपून
दे जीवदान

© पुष्पा पटेल " पुष्पम् "


सोमवार, ऑक्टोबर ०४, २०२१

शोधू कुठे?

शोधु मी कुठे
नव्हते आपुले ते
कधीही नाते 

कसे ठेवू रे
नाव मी त्या नात्याला
अनामिकाला


© पुष्पा पटेल " पुष्पम् "

मंगळवार, सप्टेंबर २८, २०२१

समई

प्रिये    हातात  हात  घेऊन तू
माझं जीवन  ग्   उजळवलेस
काजव्यापरी  येऊन तू माझ्या 
आयुष्याला प्रकाशमान केलेस

प्रारंभी भासलीस  ग् तू मजला
जणू एक   पणती मिणमिणती 
काळोख्या वाटेवर तूच झालीस
आशाकिरणाची समई जाणती

तू सखी सोबती तू सहचारिणी
तुझ्या सवे आयुष्याला  ग् गती
आता तर अंधाराला ही वाटे ग्
तुझ्या-माझ्यासमोर यायची भीती!

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल