बळीराजा शेतशिवारी रमतो
तरु,वेली,अन् पर्णापर्णावर
पाऊस सरींचा सडा जमतो
पावसाची चाहूल लागता
कवी मनाला येतो हुरुप
अक्षरांना जणू फुटतो कोंब
हिरवांकूंरा लाभे काव्य रुप
पावसाची चाहूल लागता
चातक गातो तरुतळी
पर्जन्यधारेला आलिंगन द्याया
नजर देई तो दिगंतराळी
पावसाची चाहूल लागता
वेडापिसा होतो वारा
सोबत घेऊन येई काळे ढग
अन् श्वेत मोत्यांचा धारा
पावसाची चाहूल लागता
बक तनुवरी केशरी रंग
मयुर फुलवी सुंदर पिसारा
मयुरी संगे होऊन दंग
पावसाची चाहूल लागता
सागराला जला येई उधाण
किना-याला भेट द्याया
उंच लाटांनी होई बेभान
पावसाची चाहूल लागता
मन माझे घाले रूंजी
सख्यांभोवती पिंगा घाली
झुले आठवणींची पुंजी
पावसाची चाहूल लागता
आठवण येई बालपणीची
कागदी होड्या बनवून सोडी
मज्जा ती अनोखी बालमनाची
©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"
म्हसावद