दिवाळसणाला यावर्षी अहोंकडून चांगली आठदिवसाची सुट्टी काढली.आणि विशेष म्हणजे त्यांनी ती का-कू न करता दिली. "केवढा आनंद झाला म्हणून सांगू!"
घरातली कामं सगळी आटोपून आणि ह्यांच्या दोन वेळचा डब्याची सोय करून मी एकदाची निघाली माहेरी मुलाला सोबत घेऊन.
आज भाऊबीज असल्याने सगळेच एकत्र जमणार म्हणून केवढी ती आतुरता! मन अगदी वसंतात नवी पालवी फुटलेल्या वृक्षाप्रमाणे बहरलं होतं.
गाडी पटकन बाबांच्या अंगणात थांबली आणि माझी विचारांची तंद्री तुटली.मुलाने हाॅर्न वाजवताच दोघे भाचे "आत्तु आली,आत्तु आली" करत अंगणात उतरत माझ्याकडे आली.दोघांना जवळ घेत मी घरात आले.
ओसरीत मी येणार म्हणून आतुरतेने येरझारा घालणारे बाबा,आणि माझ्या भेटीची हुरहूर लागलेली आई, कालपासून येऊन माझी वाट बघणारी बहिण,
भाऊ , वहिनी, बहिणीच्या मुली सगळेच माझी आतुरतेने वाट बघत होते.
सगळ्यांना बघून भेटून मन अगदी प्रसन्न झाले.
सगळं कसं अगदी आल्हाददायक वातावरण होते.जेवणावळी उठल्या.आवरासावर करून आमच्या भावंडांची अंताक्षरीची मैफिल रंगली.एकापेक्षा एक जुनी गाणी गाऊन आम्ही आमच्या बालपणीच्या आठवणी जाग्या करीत होतो.बालपणातही आम्ही असेच खेळ खेळायचो.तेव्हाचे ते दिवस,प्रसंग, हास्यकल्लोळ झाडपानातून सूर्यकिरणांच्या कवडसा यावा.तशा मनाच्या कोनाडयातून बाहेर पडत होते.
© पुष्पा पटेल " पुष्पम् "