माय मराठी
वर्णावी तिची किती ख्याती
एक एक अक्षर भासे
दिव्य तेजाची हो वाती
माझी माय मराठी वाटे
मजला शारदेचे दुजे रुप
आळविते मी दररोज
भक्तीगीतात राग भूप
माय मराठी माझी उदार
सारस्वतांना ती देई आशिष
अठ्ठेचाळीस स्वर-व्यंजनात
नांदतो माझा गणाधीश !
माय मराठी माझी
भाषा भगिनीत हो दहावी
महाराष्ट्र देशी तृतीय मान
किती सांगू तिची थोरवी!
माय मराठीचे आभूषण
काना मात्रा वेलांटी अनुस्वार
उद्गार,अवतरण जणू तिच्या
श्वासोच्छ्वासाचे हो हूंकार !
भूपाळी अन् अभंगवाणी
आहे माय मराठीचा आत्मा
भक्तीगीते अन् किर्तनातून
लाभे जणू अंतरीच्या परमात्मा !
म्हाइंभटे रचिला पाया
लिहून हो लिळाचरित्र
वाचते गीता रामायण वेद
रोमांचित होई माझे गात्र गात्र
हाती घेते जेव्हा ग्रंथ ज्ञानेश्वरी
अभिमान मज दाटे उरी
अभिजात साहित्याचे लेणे
मिरविते मी माझ्या शिरी !
मराठी असे माझा बाणा
करीते मी मराठीत लेखन
लाभले भाग्य थोर मज
जगते संतांचे सार-वचन !
©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"