Followers

बुधवार, जानेवारी १२, २०२२

राजमाता जिजाऊ


आऊ! तू होतीस म्हणून
उजाडली विश्वासाची पहाट 
शिवरायांना जन्म देऊन
मांडला स्वराज्याचा थाट

अनंत यातना सोसल्या
परी हार न मानिली आई
स्वराज्याचे बाळकडू पाजून
पेटवली ज्योती राजांचा हृदयी 


तूच घडविला मॉंसाहेब
एकेक श्वासासवे महा इतिहास
शब्दच झाले खड्ग तुझे
केला जुलमी सत्तेच्या -हास

घडविला तू जाणता राजा
अलौकिक शिकवण देऊन
त्रिवार वंदन जिजाऊ तुजला
आज मानाचा मुजरा करुन
         🙏🌹🙏

©® पुष्पा पटेल " पुष्पम् "

सोमवार, जानेवारी १०, २०२२

🦋 मन फुलपाखरू 🦋



आठवणींच्या हिंदोळ्यावर
मन माझे वेडे झुलते रे !
क्षणात येते क्षणात जाते
फुलपाखरू होऊन भिरभिरते रे !
बालपणीच्या अल्लड वाटा
उनाड होऊन चालते रे !
बालपणीच्या तो काळ सुखाचा
कानी हळूच गुणगुणते रे !
निमिषार्धात घेऊन गिरकी
सप्तरंग जीवनाचे दाखवी रे!
सुख हर्षाच्या गंधकोषी
सख्यासवे गूज करते रे !
नाजूक लता ही संसाराची
हळवे होऊन जपते रे !
आठवणींच्या हिंदोळ्यावर
मन माझे वेडे झुलते रे !

©® पुष्पा पटेल " पुष्पम् "

शनिवार, जानेवारी ०८, २०२२

प्रेमग्रंथ

सख्या, पुस्तक समजून हाती घेतले तुला
प्रस्तावनेत  मिळाली  प्रेमाची  आन..
खात्रीने सांगू इच्छिते पुढील पानावर
देशील तू मज  तुझ्या  हृदयी स्थान..

©® पुष्पा पटेल "पुष्पम्"

बुधवार, जानेवारी ०५, २०२२

अनाथांची माय

" अनाथांची माय: सिंधुताई यांना  शब्दसुमनांनी श्रद्धांजली !🌹🙏🏻

अनाथांचा ममत्वाचा वटवृक्ष कोसळला
आज काळ असा कसा हा निष्ठूर झाला

माई अनाथ लेकरांना तू तर दिली माया 
माई तुझा जाण्याने लाखोंची हरवली छाया

तुझाविना ओस आज ममता बालसदन
माई, तुझा जाण्याने भासे जणू ते निर्जण

ज्याला नव्हते कुणी त्यांची तू माय झाली 
तुझा विना आता त्यांना कोण ग् वाली  

तूझा एकटीत सामावले सहस्र मातांचं जगणं
माई तुझा कार्यापुढे आभाळंही वाटे ठेंगणं

झाले बहू होतील बहू तुझ्यासम ना कोणी
माई,तुला श्रद्धांजली वाहते राहीन मी ऋणी

माईंना भावपूर्ण श्रद्धांजली!
           💐😭🙏🏻

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

मंगळवार, जानेवारी ०४, २०२२

कसोटी(शेलचारोळी)

ख-या माणसाला आयुष्यात कधी
कधी  तरी  कसोटी द्यावी लागते !
भिष्म असो किंवा युधिष्ठिर असो
असो ! त्यांच्या पश्चात जग पुजीते!

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

सोमवार, जानेवारी ०३, २०२२

अभिष्टचिंतन

माझे " अहो " आणि सर्वसुखाचे सागर, प्रितीचे आगर प्रा . पुरुषोत्तम पटेल यांच्या आज वाढदिवस...🎂 
त्यानिमित्त अभिष्टचिंतनपर ही शब्दसुमने!
तुम्हास उदंड आयुष्य लाभो! ही श्री विघ्नेश्वर आणि आई जगदंबा चरणी विनम्र प्रार्थना!
🎂अभिष्टचिंतन 💐 

सख्या रे  तुझ्या सोबतीने
आनंदात  न्हाले  की मी !
सप्तजन्मीचे   सर्व   सुख
याच जन्मी अनुभवते मी! 

देवा.  तुला  प्रार्थना माझी
देशील   आशिष   तू मला
अमृतगोडीची  साथसंगत 
लाभू दे जन्मोजन्मी मला !

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

मंगळवार, डिसेंबर २८, २०२१

इवलसं मन

इवलसं मन माझं
घेतय हो उंच भरारी
गगनाला  गवसणी
घालून मारतंय फेरी

इवलसं मन माझं
झालंय फुलपाखरू
बालपणीच्या आठवणीत
रमलं कसं आवरू

इवलसं मन माझं
गेलं एकदा माहेरी
आई-बाबांशी गूज
करुन फिरलं माघारी

इवलसं  मन  माझं
गेलं ' अहो 'च्या ऑफिसात
गर्रऽकन गिरकी मारुन
परत आलं हो  घरात !

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल