Followers

बुधवार, जानेवारी १८, २०२३

माझी ओवी लेखन

पहिली माझी ओवी गं...
रिद्धी सिद्धी श्री गणेशाला
पार्वती बाळराजाला हो
शिवाचा एकदंताला !

तुमची ओवी गं...
कुलदेवता आई जगदंबेला
घालते साष्टांग नमन हो
सुख समृद्धी दे माझ्या परीवाराला

तिसरी माझी ओवी गं...
श्री स्वामी समर्थांना
सदैव राहा पाठीशी
बळी द्याहो जाला संकटाना  

चौथी माझी ओवी गं...
माझा गोड भाग्याला
भ्रतार दिर्घायू हो माझा  
प्रार्थना आई जगदंबेला

पाचवी माझी ओवी गं...
जगजेठी नारायणाला
लाभू दे कृपा तुझी
सोन्यासम लेकी बाळाला

 सहावी माझी ओवी गं...
आईबाबांचा कोईला 
निर्रामय लाभो
माझ्या मातापित्यांना !

©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम्"
  म्हसावद जि नंदुरबार

मंगळवार, डिसेंबर २०, २०२२

माझं माहेर !

माझं  माहेर  हो गोड
गाऊ  किती गुणगान
माहेर शब्द उच्चारता
विसरते  मी  देहभान

माझं   माहेर  जणू 
मायेचं साजूक  तूप
आईबाबांचा प्रेमाचं
आहे अनमोल रुप !

माझ्या माहेराची गोडी
बहू  अविट अविट
माहेरचा    वाटेवर
सोन्या चांदीचे हो पाट 

माझ्या माहेरची गाणी
गातो  स्वर्गीचा गंधर्व
माहेराची  जन्मकथा
भाट  पोथीचा संदर्भ

माहेरची  सय  येता
मनी  भेटीची हूरहूर
आई बाबांना बघण्या 
जीव  होई  अनावर !

असं  माझं  माहेर
सुखाचं  हो आगर
आनंदाचा वाहे झरा
मायेचा  ते  सागर!

©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम्"

सोमवार, डिसेंबर १९, २०२२

तरुण पिढी -एक आव्हान

🌷🌷 जिवलग ग्रुप अंतर्गत आजचा विषय - तरुण पिढी एक आव्हान
🌷🌷विषय सुचक - प्रगती ताई भोसले 🌷🌷

   आजचा विषय...तरुण पिढी एक आव्हान!
  हा विषय वाचताच माझ्या डोळ्यासमोर आजची तरुण मुले,मुली उभी राहिली.मला वाटते,ही तरुण पिढी आज  समाजासाठी खरंच एक आव्हानच आहे .हे म्हणायचं धारिष्ट्य मी का करतेय ? त्यांचे कारण---
आजची तरुण पिढीत आदर उरलेला नाही.नैतिकता स्विकारण्याची जबाबदारी दिसून येत नाही.चाळीस वर्षांपूर्वी आपण तरुण असतांना " सातच्या आत घरात.उशिर केला तर उभा राहू नको दारात! " असा आपला शिरस्ता होता.बाहेर कोणाशी वाद घालणं,दंगा करणं,एखादा स्टंट करणं.स्टंट कोणता तर,झाडावर चढणं.हे करण्याआधी सतरांदा विचार करावा लागे.कारण आपली तक्रार जर कोणी घरी केली तर आई-बाबा, काकांच्या हातचा मार मिळेल.हा नैतिक धाक वाटे.
जी काही जबाबदारी आपल्यावर सोपविली असेल ती पार पाडणे हे नैतिक कर्तव्य समजले जाई.पैसा घाम गाळून मिळतो.तो मौजमस्ती,धांगडधिंगा करुन,वायफळ खर्च करायचा नसतो.खायचं तर फक्त घरचं...तेही आईच्या हाताने बनवलेलेच ! ही शिस्त घराघरातील तरुण पिढीला होती.
  आज आपण काय पाहतो.वरील  चित्र नेमके उलटं लटकलंय.खरंय ना!चार पाच किलोमीटर पायी ये जा करुन शाळा शिकणे,शेतीकामात,घरकामात शाळा सांभाळून आई बाबांना मदत करणे,ही कामे सांभाळली जात.आज हे या तरुण पिढीला जमतच नाही.शाळेत जायला बाईक,खिशात नाश्त्याला पन्नास शंभर रुपये हवे.मोबाईल हवा.वर्षाला किमान चार पाच ड्रेस हवे.हे सगळं आजच्या तरुण पिढीला हवंच! आणि नाही दिलं तर...वृत्तपत्रात , दूरदर्शनवर आपण बातम्या पाहतो,आई बाबांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून मुलाची आत्महत्या! दूरदर्शन पाहू न देता अभ्यास कर म्हटलं तर मुलांची आत्महत्या! त्या शाळेत फी भरणं शक्य नाही,या शाळेत प्रवेश घे! म्हटलं म्हणून मुलाचे/ मुलीचे घरातून पलायन! अशा एक ना एक घटना आपण रोज वाचतो.हे किती भयानक !
 दुसरी गोष्ट आपल्या काळात आई बाबा परस्पर मुला/ मुलींची सोयरिक जुळवून मोकळे होत.तरी आपल्या काळात ब्र शब्द न काढता बोहल्यावर उभे राहावे लागे.आज ही गोष्ट दिसत नाही.आई बाबांच्या विचारांना,आवडीला छेद देऊन नकार देण्याची हिंमत तरुणाईत दिसते.अती विरोध झाला तर मग घरातून पलायन.किंवा आत्महत्या! ही गोष्ट सहज साध्य करणारी ही तरुण पिढी आव्हान ठरते आहे.
  आपल्या काळात शिक्षकांविषयी प्रचंड आदर होता.समाजातील वडिलधाऱ्या व्यक्तीविषयी आदर होता.हे आज दिसून येत नाही.शिक्षकांनी शिक्षा केली तर घरी एका शब्दानेही तक्रार न करणारी आपली पिढी.म्हणूनच तर आपणास पावकी,दिडकी,बे एकी बे,अकरा एकी अकरा हे पाढे तोंडपाठ असत.सुभाषिते ,रामरक्षा, तोंडपाठ असत.आणि आज नेमके उलटे चित्र ! शिक्षकांवर हात उगारणारी,प्रसंगी व्यसनाधीन होऊन आई बाबांवर ही हात उचलणारी मुले समाजात मोठ्या प्रमाणात दिसतात.सगळेच मुले असे वागतात.हे म्हणणे चुकीचे ठरेल.पण,आजच्या तरुण पिढीत  वृद्ध आई बाबांना सांभाळण्याची इच्छा शक्ती दिसत नाही.ते म्हणतात, " आई बाबा नव्वद वर्ष जगतील तर आम्ही काय त्यांचाच सांभाळ करावा काय? आम्हालाही काही मौजमजा आहे की नाही.मग ठेवलंय मी त्यांना वृद्धाश्रमात! " असे म्हणणारेही समाजात कमी नाहीत.ज्या आईनं नवमास पोटात वाढविले,दिड दोन वर्ष स्तन्य पाजले ,ज्या बापाने घोडा होऊन घरभर पाठीवर मिरविले.त्यांचे हाल करणारी अशी तरुण मुले पाहिली,ऐकली की आजचे जगण्याचे प्रचंड आव्हान समोर उभे राहते.आणि वाटतं खरंच तरुण पिढी एक आव्हान आहे.
     लिहिण्यासारखे भरपूर आहे.पण,लेखणी इथेच थांबविते!


🌷🌷 जिवलग सारखा ग्रृप असावा 🌷🌷
🌷🌷 प्रेम जिव्हाळा मनी वसावा 🌷🌷


©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम्"

सोमवार, नोव्हेंबर १४, २०२२

माझं गोड बालपण (अष्टाक्षरी)

आठवलं आज मला
माझं गोड  बालपण
प्रेम   भाव  निरागस
जणू   केळं शिकरण।।१।।

स्वप्न    दुनियेत    रमे
जणू  छान  परीराणी
खेळतांना गाऊ आम्ही 
गोड   सुमधूर  गाणी।।२।।

बसायला   होती  एक
शुभ्र पंखांची हो गाडी
ओढायला होती छान
दोन  हरणांची   जोडी।।३।।

मन   उद्यानी   बागडे
छान   ग्   फुलपाखरू 
सप्तरंगी       दुनियेत
उडायचे     भिरभिरू।।४।।

साय    दुधावरची  हो 
आजी आजोबांची माया  
प्रेम, माया   सावलीत 
खुलायची माझी काया।।५।।

खेळताना    होत  असे
आम्हा  मैत्रिणींची गट्टी
धावताना      पडताना
क्षणोक्षणी  कट्टी   बट्टी।।६।।

सरसर     येता    सरी
झेलायचो      हातावर
पावसांत    भिजतांना
हर्ष   होई      अनावर।।७।।

करायचो    आळवणी
आम्ही  भोलानाथाला
तळे  साचू  दे  शाळेत
सुटी मिळू दे आम्हाला।।८।। 

*आज येता  बालदिन*
आठवलं      बालपण
नेहरुंना    करीते    मी 
विनम्रसे   अभिवादन !।९।।।

©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम्"

मंगळवार, ऑक्टोबर २५, २०२२

दिपोत्सव (अष्टाक्षरी)

दिपोत्सव  आनंदाचा
तेजोमय   प्रकाशाचा
करु  साजरा   आनंदे
सण  महा मांगल्याचा

दिपोत्सव  आनंदाचा
करु दिव्यांची आरास
लावू  आकाशकंदील 
शोभा आणुया  घरास

आला  प्रथम  दिवस
संगे   हो   वसूबारस 
गोवत्साला   भरवूया
गवार  भाकरी  घास

येता      धनत्रयोदशी 
पुजा   धन   धन्वंतरी
आयुर्रोग्य लाभे सर्वा
तेज    पसरे    अंतरी

येता    नर्क   चतुर्दशी 
प्रातः हो अभ्यंगस्नान 
सडा  टाकता अंगणी
शोभे रांगोळीही छान 

करीता    लक्ष्मीपूजन
वाढे   गृहलक्ष्मी  मान
धूपदिप        नैवेद्याने
करु  वही  पूजा  छान

प्रिय  दिवाळी  पाडवा 
गृह  स्वामीचे  औक्षण
मिळे प्रेम स्नेह सौख्य
लाभे सौभाग्याचा दिन

भाऊबीज   आनंदाची
बंध   रेशमाचे    अतुट 
ओवाळीता   बंधुराजा
जुळे नाते   हो  अवीट

©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम्"

मंगळवार, ऑक्टोबर ११, २०२२

आई, घे ना गं उसंत !

आई तू  घे ना उसंत थोडी
आता नको ना करु ग् कष्ट !
आता तरी जग स्वतःसाठी  
आरोग्याला आहे वेळ इष्ट

भल्या पहाटे उठून सारे
काम हातावेगळे करते
कधीतरी निवांत बसून
घे मज्जा बघ कसे वाटते

जीवाला जीव लावणारी ग् 
आई माणसं तू  जमवली
राग लोभ मनी न ठेवता
ऋणानुबंधात ती बांधली

सगळ्यांचं सगळं केलं तू
दुःख संकटे सारे झेलले
आई तरी तुझ्या मुखातून
अमृताचे   झरे   पाझरले

आई  अनंत माया ममता 
सदैव   करते   पिल्लांवर
एकदा   तरी  करुन  बघ 
प्रेम तुझे  तू  ग  स्वतःवर

©® सौ पुष्पा पटेल "पुष्पम् "

रविवार, ऑक्टोबर ०९, २०२२

कोजागिरी पौर्णिमा

शरद्पौर्णिमेच्या चांदण्यात 
मी घेतली लेखणी हाती
आनंद वाटे मजला आज 
सारं  विश्व  आज सोबती 

ता-यांचा झुल्यावर आज
चांदोबा   बघा   विराजले
क्षिरपात्र  भासे मज जणू
अमृत  घट  घेऊन  आले
  
निळ्या नभीचे चंद्र किरण
केशरयुक्त  दुधात  न्हाती
वाटे  चांदण्यांचा संगतीने
कृष्ण राधा रास खेळती !

समृध्दीचा आशिष देऊन
निघाली कोजागिरी निशा
सुख समृद्धी वस्र लेऊन
पहा उजाडल्या दशदिशा !

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम् "

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल