Followers

सोमवार, डिसेंबर १९, २०२२

तरुण पिढी -एक आव्हान

🌷🌷 जिवलग ग्रुप अंतर्गत आजचा विषय - तरुण पिढी एक आव्हान
🌷🌷विषय सुचक - प्रगती ताई भोसले 🌷🌷

   आजचा विषय...तरुण पिढी एक आव्हान!
  हा विषय वाचताच माझ्या डोळ्यासमोर आजची तरुण मुले,मुली उभी राहिली.मला वाटते,ही तरुण पिढी आज  समाजासाठी खरंच एक आव्हानच आहे .हे म्हणायचं धारिष्ट्य मी का करतेय ? त्यांचे कारण---
आजची तरुण पिढीत आदर उरलेला नाही.नैतिकता स्विकारण्याची जबाबदारी दिसून येत नाही.चाळीस वर्षांपूर्वी आपण तरुण असतांना " सातच्या आत घरात.उशिर केला तर उभा राहू नको दारात! " असा आपला शिरस्ता होता.बाहेर कोणाशी वाद घालणं,दंगा करणं,एखादा स्टंट करणं.स्टंट कोणता तर,झाडावर चढणं.हे करण्याआधी सतरांदा विचार करावा लागे.कारण आपली तक्रार जर कोणी घरी केली तर आई-बाबा, काकांच्या हातचा मार मिळेल.हा नैतिक धाक वाटे.
जी काही जबाबदारी आपल्यावर सोपविली असेल ती पार पाडणे हे नैतिक कर्तव्य समजले जाई.पैसा घाम गाळून मिळतो.तो मौजमस्ती,धांगडधिंगा करुन,वायफळ खर्च करायचा नसतो.खायचं तर फक्त घरचं...तेही आईच्या हाताने बनवलेलेच ! ही शिस्त घराघरातील तरुण पिढीला होती.
  आज आपण काय पाहतो.वरील  चित्र नेमके उलटं लटकलंय.खरंय ना!चार पाच किलोमीटर पायी ये जा करुन शाळा शिकणे,शेतीकामात,घरकामात शाळा सांभाळून आई बाबांना मदत करणे,ही कामे सांभाळली जात.आज हे या तरुण पिढीला जमतच नाही.शाळेत जायला बाईक,खिशात नाश्त्याला पन्नास शंभर रुपये हवे.मोबाईल हवा.वर्षाला किमान चार पाच ड्रेस हवे.हे सगळं आजच्या तरुण पिढीला हवंच! आणि नाही दिलं तर...वृत्तपत्रात , दूरदर्शनवर आपण बातम्या पाहतो,आई बाबांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून मुलाची आत्महत्या! दूरदर्शन पाहू न देता अभ्यास कर म्हटलं तर मुलांची आत्महत्या! त्या शाळेत फी भरणं शक्य नाही,या शाळेत प्रवेश घे! म्हटलं म्हणून मुलाचे/ मुलीचे घरातून पलायन! अशा एक ना एक घटना आपण रोज वाचतो.हे किती भयानक !
 दुसरी गोष्ट आपल्या काळात आई बाबा परस्पर मुला/ मुलींची सोयरिक जुळवून मोकळे होत.तरी आपल्या काळात ब्र शब्द न काढता बोहल्यावर उभे राहावे लागे.आज ही गोष्ट दिसत नाही.आई बाबांच्या विचारांना,आवडीला छेद देऊन नकार देण्याची हिंमत तरुणाईत दिसते.अती विरोध झाला तर मग घरातून पलायन.किंवा आत्महत्या! ही गोष्ट सहज साध्य करणारी ही तरुण पिढी आव्हान ठरते आहे.
  आपल्या काळात शिक्षकांविषयी प्रचंड आदर होता.समाजातील वडिलधाऱ्या व्यक्तीविषयी आदर होता.हे आज दिसून येत नाही.शिक्षकांनी शिक्षा केली तर घरी एका शब्दानेही तक्रार न करणारी आपली पिढी.म्हणूनच तर आपणास पावकी,दिडकी,बे एकी बे,अकरा एकी अकरा हे पाढे तोंडपाठ असत.सुभाषिते ,रामरक्षा, तोंडपाठ असत.आणि आज नेमके उलटे चित्र ! शिक्षकांवर हात उगारणारी,प्रसंगी व्यसनाधीन होऊन आई बाबांवर ही हात उचलणारी मुले समाजात मोठ्या प्रमाणात दिसतात.सगळेच मुले असे वागतात.हे म्हणणे चुकीचे ठरेल.पण,आजच्या तरुण पिढीत  वृद्ध आई बाबांना सांभाळण्याची इच्छा शक्ती दिसत नाही.ते म्हणतात, " आई बाबा नव्वद वर्ष जगतील तर आम्ही काय त्यांचाच सांभाळ करावा काय? आम्हालाही काही मौजमजा आहे की नाही.मग ठेवलंय मी त्यांना वृद्धाश्रमात! " असे म्हणणारेही समाजात कमी नाहीत.ज्या आईनं नवमास पोटात वाढविले,दिड दोन वर्ष स्तन्य पाजले ,ज्या बापाने घोडा होऊन घरभर पाठीवर मिरविले.त्यांचे हाल करणारी अशी तरुण मुले पाहिली,ऐकली की आजचे जगण्याचे प्रचंड आव्हान समोर उभे राहते.आणि वाटतं खरंच तरुण पिढी एक आव्हान आहे.
     लिहिण्यासारखे भरपूर आहे.पण,लेखणी इथेच थांबविते!


🌷🌷 जिवलग सारखा ग्रृप असावा 🌷🌷
🌷🌷 प्रेम जिव्हाळा मनी वसावा 🌷🌷


©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम्"

३ टिप्पण्या:

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल