Followers

मंगळवार, जुलै १९, २०२२

प्रेमाची वाट

सख्या... प्रेमाच्या वाटेवर
आपली जन्मोजन्मीची साथ
आले कितीही संकटे तरी
नेटाने करु रे त्यावर मात !

सख्या... प्रेमाच्या  वाटेवर
प्राजक्ताचा सडा दरवळला
विश्वासाचा नाजुक धाग्यात
मी माया ममतेचा मोती गुंफला 

सख्या... प्रेमाच्या  वाटेवर
सप्तप्रीतिचे इद्रधनु साकारले
जिव्हाळ्याचा वर्षावाचे तेज
मी हृदयाचा कोंदणी बसविले

सख्या...प्रेमाच्या वाटेवरची
तुझ्या माझ्या प्रेमाची रीत न्यारी
गोष्ट आहे एक नाविन्यतेची
युगानुयुगे वाटेल दुनियेला भारी !
©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम् "

शनिवार, जुलै ०२, २०२२

साखर पेरा...!

हसत खेळत रमत गमत
जगून घ्यावा प्रत्येक क्षण
क्षणभराचा सुखासाठी
दुखवू नका कुणाचं मन !

काही काळासाठी आहोत 
आपण पाहुणे भूतलावरी
लक्षात असू द्या ही समज
गोड रहा सर्वांशी साखरेपरी

गमतीनेही चोळू नका हो!
कुणाच्या दुखण्यावर मिठ 
मरणातही जगाने गावे
आपले प्रीतगोडवे अविट

©®सौ.पुष्पा पटेल " पुष्पम् "

शनिवार, जून २५, २०२२

घे भरारी

बाळा,
तुझे जीवन सुगंधी गुलाबासारखे फुलावे
काट्यांशी सावध राहून त्यास तू खुडावे

तुझे तन मन तिन्ही सांज उमलावे
अत्यानंदाचा डोहात तू आकंठ डुंबावे

तुझ्या भरारीपुढती गगनही ठेंगणे व्हावे
पण् धरणीशी नाते तुझे घट्ट जुळावे

विहरतांना दशदिशी तुझ्या किर्तीला पंख फुटावे
माणूसकीचा उर्ध्व दिशेने तू उंच उंच उडावे

©®सौ. पुष्पा पटेल "पुष्पम् "

शुक्रवार, जून १७, २०२२

संजीवक अमृत चहा !

चहा म्हणजे सकाळचं अमृत असतो
चहा म्हणजे जगण्याची उर्मी
अन् हाॅस्पीटल मधल्या रुग्णांची स्फूर्ती
कार्य करण्याची देतो शक्ती
टेंशन आलं की सुचवितो नामी युक्ती
पाहुणचाराला तो प्रथम हवा
पार्टीला त्याचा पहिला मान
मुलाखतीला असतो टेबलवरची शान
कुणी काहीही म्हणा पण चहा हवाचं
पावसाळ्यात रिमझिम पावसात लागते भूक
तेव्हा गरम गरम भजी बरोबर वाफाळणारा चहा म्हणजे...
जणू स्वर्गसुख
असा गोड गोड अमृतमय चहा प्यायची मज्जा भारी
लहान मुलं खातात त्यांच्यासोबत बिस्कीट-खारी
अशा गोड दिव्य चहाची गोष्ट खूप खूप भारी !

समस्त चहा शौकीनांना आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
☕🫖☕🌹🌹☕🫖☕

©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"
      म्हसावद

शनिवार, मे २८, २०२२

माझे बालपण!

म्हणतात ना "बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा!"अगदी तसंच माझं बालपण साखरेचा रव्यासारखं खूप खूप गोड होते!
कधीही मला आता कंटाळा आला की तेव्हा आठवते मी माझे गोड, खट्याळ बालपण आणि बालपणीच्या आठवणी! कित्ती मज्जा होती त्यावेळी...ना कसलं काम ना कसली जबाबदारी होती फक्त मी आनंदलहरी!बाबांची होती लाडकी आईची सोनुली तर आज्जी आजोबांची होते मी तान्हुली !काय सांगू तुम्हाला माझी बालपणीची गम्मत सगळ्यांची मी होते लाडकी
मैत्रीणींसोबत खेळ खेळत अल्लडपणे खिदळणे, भातुकलीच्या खेळ नी त्यातले रुसवे फुगवे,अक्षय तृतीया आली की झोपाळा त्यानंतर गौराईचा गोतावळा, कोजागरी पौर्णिमा आली भुलाबाईची गाणी, झिम्मा फुगडी रास,गरबा एकमेकांचा खाऊ ओळखण्याची चढाओढ तसेच रंगपंचमीच्या सप्तरंगात न्हाणे! सगळं कसं अगदी स्वर्ग सुख होतं. अगदी सुख असो की दुःख कधीच मागे नाही राहिलो.सगळ्या मैत्रीणी अगदी जीवाला जीव देणा-या होतो आणि आजही आम्ही सगळ्या मैत्रिणी भेटतो,मोबाईलवर बोलतो तासनतास!
  तसेच आमच्या घरीही आम्ही तिन भावंड मी मोठी त्यानंतर एक बहिण आणि मग लहान भाऊ.
मी मोठी असल्याने मला नेहमीच समजूतदारपणा दाखवावा लागे आणि ती दोघं नेहमी भांडायची पण मला मात्र आज्जी म्हणायची बेटा तू मोठी बहीण आहे त्या दोघांची मग तू घे ना समजून! मला मात्र तेव्हा खूप राग यायचा माझ्या मोठेपणावर.वाटायच़ं,"बाप्पाने मलाच का मोठी बहीण केलं मी सगळ्यात छोटी असते तर कित्ती मज्जा आली असती?"
  तसेच मामाच्या गावाला सुट्टीत ही खूप खूप मजा केली आम्ही.मामेभाऊ, मामेबहीण सगळे भर दुपारी नाना नानी झोपले की गुपचूप  उन्हात पानपिपळी,डबल इस्टोल असे खेळ खेळायला पळायचो.आणि मग नानांना जाग आली की एकमेकांवर यानेच मला खेळायला नेले असं खोटे आरोप करुन वेळ निभावून न्यायचो.कितीही भांडण झाले तरीही रात्री एकाच ताटात आनंदाने जेवायचो.कित्ती निर्मळ होते तेव्हा मन!
बालपण म्हणजे देवाने दिलेली अनमोल भेट असं मला वाटतं.म्हणून मी ते माझ्या हृदयाच्या कोंदणात अगदी अलगदपणे जपून ठेवलं आहे.
 आज एवढंच बस्स🙏

©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"
          ‌म्हसावद

मंगळवार, मे २४, २०२२

चाहूल पावसाची

पावसाची चाहूल लागता
बळीराजा शेतशिवारी रमतो
तरु,वेली,अन् पर्णापर्णावर
पाऊस सरींचा सडा जमतो

पावसाची चाहूल लागता
कवी मनाला येतो हुरुप
अक्षरांना जणू फुटतो कोंब
हिरवांकूंरा लाभे काव्य रुप

पावसाची चाहूल लागता
चातक गातो तरुतळी
पर्जन्यधारेला आलिंगन द्याया
नजर देई तो दिगंतराळी

पावसाची चाहूल लागता
वेडापिसा होतो वारा
सोबत घेऊन येई काळे ढग
अन् श्वेत मोत्यांचा धारा

पावसाची चाहूल लागता
बक तनुवरी केशरी रंग
मयुर फुलवी सुंदर पिसारा
मयुरी संगे होऊन दंग 

पावसाची चाहूल लागता
सागराला जला येई उधाण
किना-याला भेट द्याया
उंच लाटांनी होई बेभान

पावसाची चाहूल लागता
मन माझे घाले रूंजी
सख्यांभोवती पिंगा घाली
झुले आठवणींची पुंजी

पावसाची चाहूल लागता
आठवण येई बालपणीची
कागदी होड्या बनवून सोडी
मज्जा ती अनोखी बालमनाची

©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"
     म्हसावद

मंगळवार, मे ०३, २०२२

जीवन एक काव्यग्रंथ!

जीवनाच्या कवितांनी भरली
माझ्या   काव्यग्रंथाची  पाने
सुख  अश्वावर  होऊन स्वार
मी गाते  सुमधूर जीवनगाणे

जीवनाच्या  कवितेत माझ्या
आहे  बरं आनंदाची  हो पानं
त्या  पानांना  जपते  हळूवार
वाटते  मी  सुखाचे  हो  दान

जीवनाच्या  कवितेत  माझ्या
निरागस   बालपणाचं   पान
मौज - मज्जा   आणि  खेळ
आहेत  जणू आनंदाची खाण

जीवनाच्या  कवितेत  माझ्या
सप्तरंगी  जबाबदारीचे  पान
आपुलकीच्या   दृष्टीने  बांधून
वाटते   स्नेह   सौख्याचे वान

जीवनाच्या   कवितेत  माझ्या
सहजीवनाचं    अनोखं   पान
विश्वास    समर्पण   हृद्यप्रेमाने
अहोंचा हृदयी मिळविले स्थान!

©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल