Followers

मंगळवार, मार्च १५, २०२२

खरा धर्म!

दुसऱ्यांचा आनंदात माना आनंद

हृदयग्रंथी लिहीत जावे एकेक पर्व

रेऽऽ मनवा जैसी करणी वैसी भरणी

प्रेम अर्पावे सकला हाच खरा धर्म !


यशस्वी जीवनाचा महा मूलमंत्र

निरपेक्ष  भावनेने  करावे  कर्म

प्रामाणिकपणा, आनंद, समाधान

हेच खरे यशस्वी जीवनाचे मर्म !


©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"

गुरुवार, मार्च १०, २०२२

क्रांतीज्योती सावित्रीबाई !


सावित्री...तू नंदादिपातली वाती
तेजाळली दशदिशी अखंड ज्ञानज्योती

तूच दिला आम्हा एक महामंत्र…!
लढेन मी ! पण मिळविन विद्यातंत्र 

तुझ्या मुखी वदली संकल्पसिद्धी 
केले सज्ञान मज होते मी मंदबुद्धी

तू तोडीली बेडी आमुच्या पायीची 
रांधा वाढा उष्टी काढा परंपरांची

तूच श्वेतवस्रा सरस्वतीदेवी माझी
वंदिन चरण गाईन आरती तुझी 

ज्ञानदेव जमविला वारकरी पंढरी
दिनदुबळ्या लेकींची तू झाली वैखरी

तू दिल्या बळे घेते मी नभी भरारी
सुविचारांचे तोरण बांधिले मी दारी

मी आहे खंबीर उभी समस्त क्षेत्री
कृतज्ञ मी तुज क्रांतीज्योती सावित्री

©® पुष्पा पटेल " पुष्पम् "

मंगळवार, मार्च ०८, २०२२

कर्तृत्वाचे पान!

जागतिक महिला दिनाचे औचित्याने 
नकोय आम्हां एक दिवसाचा  सन्मान
सकल क्षेत्रात लिहू द्या कर्तृत्वाचे पान
पुरुषांनो...आमच्यामुळे आहे तुम्हाला स्थान

नका करू जन्मभर आमुची अवहेलना
वेळ आली तर होतो आम्ही रणरागिणी
जाणिव ठेवा आमुच्या त्याग अन् अस्तित्वाची
स्री तर आहे अखिल विश्वाची जननी!

©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"
 जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹

मंगळवार, मार्च ०१, २०२२

माय मराठी

माय मराठी

माझी माय मराठी 
वर्णावी तिची किती ख्याती
एक एक अक्षर भासे
दिव्य तेजाची हो वाती
 
माझी माय मराठी वाटे
मजला शारदेचे दुजे रुप
आळविते मी दररोज
भक्तीगीतात राग भूप

माय मराठी माझी उदार
सारस्वतांना ती देई आशिष
अठ्ठेचाळीस स्वर-व्यंजनात
नांदतो माझा गणाधीश !

माय मराठी माझी
भाषा भगिनीत हो दहावी
महाराष्ट्र देशी तृतीय मान
किती सांगू तिची थोरवी!

माय मराठीचे आभूषण 
काना मात्रा वेलांटी अनुस्वार
उद्गार,अवतरण जणू तिच्या
श्वासोच्छ्वासाचे हो हूंकार !

भूपाळी अन् अभंगवाणी
आहे माय मराठीचा आत्मा
भक्तीगीते अन् किर्तनातून
लाभे जणू अंतरीच्या परमात्मा !

म्हाइंभटे रचिला पाया
लिहून हो लिळाचरित्र
वाचते गीता रामायण वेद
रोमांचित होई माझे गात्र गात्र 

हाती घेते जेव्हा ग्रंथ ज्ञानेश्वरी 
अभिमान  मज  दाटे उरी
अभिजात साहित्याचे  लेणे
मिरविते मी माझ्या शिरी !

मराठी असे माझा  बाणा 
करीते  मी मराठीत लेखन
लाभले भाग्य थोर मज
जगते संतांचे सार-वचन !

©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"

शनिवार, फेब्रुवारी २६, २०२२

स्री...!

प्रत्येक   स्री   एक  रहस्य  आहे
जाणणे  नव्हे  सोपे कठीण फार

करते  हो  घरासाठी  कष्ट अपार
हृदयी  जपते   ती   मूल्य  हजार

त्याग  बलिदान  तिचे  अपरंपार
ध्येय  गाठते  ती  होई ना लाचार

प्रेम,  जिव्हाळा , तिचे   रत्नहार
रेशीमबंधांनी देते घराला आकार

स्वार्थ  ना  तिला  मुळीच कसला
कुटुंबातील सर्वांचे  स्वप्न  साकार!

©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"


गुरुवार, फेब्रुवारी २४, २०२२

जागतिक मुद्रण दिवस

आज मुद्रणाचे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. नव्या तंत्रसाधनांच्या आगमनामुळे तर मुद्रण जनसामान्यांच्या आवाक्यात आले आहे. कार्यालयांतली कागदपत्रे असोत वा पाठ्यपुस्तके, साहित्यपर वा इतर माहितीपुस्तके, मुद्रणसाधनांतील प्रगतीमुळे पूर्वीपेक्षा मुद्रणाचे प्रमाण नक्कीच वाढलेले दिसेल. अलीकडे डिजिटल माध्यमाचा प्रसार होऊ लागला असला तरी मुद्रण हेच अजूनही अनेकांना सोयीचे आहे.
मुद्रण म्हणजे छपाई. कागदावर काही ठसा उमटविणे, असा या क्रियेचा ढोबळ अर्थ. शब्द वा चित्रांच्या एकाच नमुन्याच्या ठसा असलेल्या अनेक प्रती तयार करणे म्हणजे मुद्रण. असे म्हणता येईल.
योहानेस गुटेनबर्ग (Johannes Gutenberg) यांचा जन्म २४ फेब्रुवारी १३९८ रोजी मेंज (जर्मनी) येथे झाला.त्यांचा जन्मदिवस प्रत्येक वर्षी    ' जागतिक मुद्रण दिन ' (World Printing Day 2020) म्हणून जगभर साजरा केला जातो. त्यामुळे त्यांना मुद्रण कलेचा जनक मानले जाते. मुद्रणकलेचा जनक योहानेस गुटेनबर्ग (Johannes Gutenberg) 
ने केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्याचा जन्मदिवस 'जागतिक मुद्रण दिन' म्हणून साजरा केला जातो. 
मुद्रण कलेच्या शोधामुळेच आज आपण वैचारिकदृष्ट्या समृद्ध आहोत.  सोशल मीडिया क्षेत्रात केलेली प्रगतीही मुद्रण कलेचाच उत्तम नमुना आहे.
इसवी सनानंतरच्या दुसर्‍या शतकात चीनी लोक कोरलेल्या मजकुरावर विशिष्ट शाई लावून त्यावर ओलसर कागद दाबून मुद्रणाचा ठसा मिळवीत असतं. यावरून चीनी लोकांना मुद्रणप्रतिमेद्वारा प्रिंटिंगचे तंत्र गवसले होतेच.पण हे तंत्र वेगाने प्रसिध्द पावले नाही.मात्र
नंतरच्या काळात योहानेस गुटेनबर्गने मुद्रण कलेचा आणि तद्नंतर त्यानेच छपाई यंत्राचाही शोध लावला.गुटेनबर्गने इ.स.१४३४-३९ या काळात मुद्रा, मातृका व शिशाचा उपयोग करून त्याने स्ट्रासबोर्ग येथे सर्वप्रथम ४० पानांचे बायबल छापले.यास ' गुटेनबर्ग बायबल ' असे म्हणतात.हा जर्मनीत चांदीचा कारागिरी होता. योहानेस यांनी अक्षरांचे सुटे खिळे बनवण्याचा शोध लावला.त्यातून इ.स.१४५० मध्ये   मुद्रित ' कांस्टेन मिसल ' हे पहिले पुस्तक होय.त्याचा केवळ तीन प्रती उपलब्ध आहे.त्या प्रतीतील एक म्युनिक (जर्मनी), दुसरी ज्यूरिख (स्वित्झर्लंड), तिसरी प्रत न्यूयॉर्क येथे आहे. या शोधामुळे मुद्रण पद्धतीत लागणारा वेळ कमी झाला.गुटेनबर्गची ही मुद्रण व छपाई कला युरोपात व जगभर प्रचंड वेगाने पसरली.
* भारतातील मुद्रणकला :-
भारतामध्ये मुद्रणकला १५५६ साली आली. पोर्तुगालमधून जहाजावरून छपाईयंत्र प्रथम गोव्यात आणण्यात आले. त्यानंतर या तंत्राचा प्रसार गोव्यातून भारताच्या इतर भागांमध्ये झाला.
  अमेरिकन मिशनने मुंबई येथे  १८१३ साली ' अमेरिकन मिशन प्रेस ' हा मोठा छापखाना सुरु केला.  मुद्रणाची सुरुवात केली.या साठी त्यांनी श्रीरामपूरातून देवनागरी लिपीचे खिळे आणले. या मुद्रणालयात काम करणारे टॉमस ग्रॅहम मातृका तयार करण्यास शिकले त्यांनी देवनागरी आणि गुजरातीचे साचे बनवून मातृका तयार केल्या.त्यांच्या कडून गणपत कृष्णाजी पाटील हे  मातृका बनविण्यास शिकले. आणि स्वतःचा छापखाना आपल्या थळ या गावी सुरु केला.१६ मार्च १८४१ च्या दिवशी शिळाप्रेसवर त्यांनी पहिले पंचांग छापले.त्यासाठीची शाई सुद्धा त्यांनी स्वतः तयार केली होती.
* मुद्रण व पर्यावरण:-
महत्प्रयासाने गवसलेले  हे सर्व  तंत्र अधिकाधिक प्रदूषणकारी होत आहे. उदाहरणार्थ, संगणकाच्या अथवा मोबाइलच्या वापरातून तसेच ई-प्रिंटर्समधून होणारे ई-प्रदूषण; छपाई यंत्राच्या प्रिंटिंग कॉइलमधून होणारे गंभीर सूक्ष्मकणांचे रासायनिक प्रदूषण; लाखो प्रती क्षणात छापणाऱ्या राक्षसी छपाई यंत्रातून निर्माण होणारा कचरा, इत्यादी.

हे पाहता, किमान आपण आपल्यापुरते तरी मुद्रण कमी करू शकतो का? याचा विचार केला पाहिजे. म्हणजे आवश्यकता नसताना प्रिंटरवर कोणतीही छपाई करायची नाही, आपल्या हाताने लिहिण्याची क्षमता उपयोगात आणायची.

©®सौ. पुष्पा पटेल " पुष्पम "
मु.पो.म्हसावद,ता.शहादा, नंदुरबार 

बुधवार, फेब्रुवारी २३, २०२२

माझा झोका!


काव्यलेखन प्रकार- मत्स्य काव्य
शिर्षक - माझा झोका
             उंच जाई
          झोका बाई वर
        जणू गगनावरी हो
     स्वर्ग  उरे  एक वितभर
     क्ष‌णात   येई   धरणीवर
    झुलवी मज खाली न् वर
        काय सांगू नवलाई
             प्रेम देई खरं
               उंच जाई
            वाटे त्यात बरं

    ©® पुष्पा पटेल " पुष्पम् "
       मु.पो.म्हसावद,ता.शहादा,
                 जि.नंदुरबार

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल