वाटतं तितकं सोपं नाही बरं गृहिणीला कवयित्री बननं
लाटणं असणा-या हातात लेखणी धरणं
अडचणी अनेक पण् ध्यास मात्र एक
कोंडलेल्या भावना कागदावर उतरवणं
कितीतरी चांगले विचार...
गरम फोडणीत मिक्स होतात
कधी मिक्सरचा पात्यांमध्ये भरडले जातात
कधी कणिक मळतांना मळले जातात...
कधी साखरेचा पाकात अलगत घोळले जातात
अगदी सहजच...
तरीही ती धडपडते लिहायला
सोसलेलं,घेतलेलं,अनाहूत मिळालेले...
सुख कमी पण दुःख जास्त
मनाच्या कप्प्यात हृदयाच्या मलमली गाठोड्यात बांधलेले सगळं शब्दगंधाने परत द्यायला !
अनुभवलेलं विचार लेखनीतून मांडायला!
कधी यजमानांचा मार्गदर्शनाने
कधी समाजाच्या वर्तुळ परीघात राहून...
झटकून टाकते; लेखणीतील शाई झटकून टाकावी तसे...
मनातले मळकट दौर्बल्य एकेक अक्षरांनी उतरवते कागदावर !
धैर्याने...लढते प्रत्येक वळणावर...
होते रणरागिणी वेळ आल्यावर
स्वतःचे अनुभव सामर्थ्य घेऊन
जन्मते तीची कला अष्टही आघाड्यांवर
लढते ती होऊन नवदुर्गा!
विचार खड्गांचा खणखणाटातून दशदिशांना मग तिचाच बोलबाला !
©® पुष्पा पटेल " पुष्पम् "