Followers

मंगळवार, फेब्रुवारी ०१, २०२२

सख्या रे...

सख्या...नात्यातलं प्रेम
जणू कृष्णाच्या मुकूटातील मोरपीस
हळूवार जपतेय रे मी !

प्रीतिच्या श्रावणसरींत 
सप्तरंगी इंद्रधनु कवेत घेऊन
आनंदात चिंब भिजते मी!

तुझ्या हृदय फुलावर
शब्दसुमनांवर अलवार 
फुलपाखरू बनून बागडते मी!

कुणाचीही तमा न करता
होऊन लाट सागराची
तुझ्यात अल्लडपणे विसावते मी!

शेवटी काय...जीवन म्हणजे -
सुखदुःखाचा सप्तरंगी चलपट
विसरुन सारे बिंधास्त बघते मी!

आजची हिरवी पाने उद्याची पिवळी
ठेवते मी जाणीव...
ह्यालाच जीवन ऐसें नाव तुझी होऊन जगते मी!

©® पुष्पा पटेल " पुष्पम् "

शनिवार, जानेवारी २९, २०२२

प्रीत तुझी माझी



समजले  न मज कधी
मन माझे तुझ्यावर जडले

प्रेमाचं बीज कधी तू रे
हृदयी हो माझ्या पेरले

प्रितीचा रंगात तुझ्या
बेधुंद होऊनी मी रंगले

साजना कळेना मला रे
प्रेमांकूर कधी हे डवरले

प्रीत रोपटे गोंजारले तू
रोमरोमी बहरुन आले

पानोपानी वसंत फूलला
गंध सुमनांचे श्वासात मी कोंडले

मिठीत घेता तू मजला
हृदय हे ओथंबून आले

कळेना मज झाले काय असे
आज मी माझी नच उरले

©® पुष्पा पटेल " पुष्पम् "

शुक्रवार, जानेवारी २८, २०२२

स्वप्नांची दुनिया

राजा.. माझ्या स्वप्नांचा दुनियेत रे
तुझ्या रुपात होते आनंद बरसात
तू तर  माझं पहिलं प्रेम आहेस रे
प्रितीचे माणिक-मोती मिळती मज
तुझ्या हृदयसागरात !

©® पुष्पा पटेल " पुष्पम् "

बुधवार, जानेवारी २६, २०२२

वंदन भारतमाते🙏

भाग्यवंत मी! अभिमान मजला
नागरिक भारत देशाची !!!
वारस मी भारतमातेच्या मुक्तीसाठी
प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांची...

वाचते मी गाथा त्या त्यागाची
मुक्त कराया भारतमाते
टिळा लावला रक्ताचा भाळी
तुझ्या थोर सुपूत्रांची !

जुलूमी सत्ता जाळूनी दाविला
सूर्योदय मज स्वातंत्र्याचा 
करेन भारतमाते तुझी पूजा
वंदे मातरम् महा मंत्रांनी !

कथा सदैव स्मरेन मी बलीदानाची
इतिहासाच्या पानोपानी सुवर्णाक्षरे 
कोरली नावे त्या समरविरांची 

शिष नमवून मी करीते नमन 
पावन हे भारतमाते
प्रजासत्ताक दिनी उच्चरवाने
इन्कलाब जिंदाबाद ! जय हिंद ! गाते.

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🌹🌹🙏🙏

©® पुष्पा पटेल " पुष्पम् "

सोमवार, जानेवारी २४, २०२२

* लेक माझी लाडाची *

* लेक माझी लाडाची *

लेक  माझी हो लाडाची
राजकन्या शोभे  घराची
जणू सोनपावलांनी आली 
माझ्या घरी लक्ष्मी आनंदाची

लेक माझी हो खूपच शहाणी
मुखी तिच्या सावित्रीची गाणी
सर्वांशी बोले मायेने  गोडगोड
एक एक शब्द अमृताची फोड

घरकामात तिचा मज मदतीचा हात
भावभक्तीने  लावी  देवघरात   वात
अशी  माझी  गोडूली वाटे  सोनपरी
आठवणींचे गाठोडे ठेवून नांदते सासरी

अशी  लेक  हो  माझी  भाग्याची 
लेकीदिनाला आठवलं तिचं कर्तृत्व
तिचं जगणं जणू वटवृक्षाची छाया
लेकीच्या जन्माने धन्य झाले मातृत्व !

©® पुष्पा पटेल " पुष्पम् "

रविवार, जानेवारी २३, २०२२

सख्या रे

       
सांजवेळ झाली आता
थकली  रे वाट  पाहून
चाहूल लागता तुझी रे
हसू ओसंडलं ओठातून

तुला  बघताच  ऋतूराज 
वसंत फुलला मम हृदयी
गंगा  यमुना  बघताच  रे
पाण्यावर धावल्या गायी

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

शनिवार, जानेवारी २२, २०२२

रुक्मीणीपती

रुक्मीणीपती
देवा,कृपाळा पांडुरंगा !🙏
भाव तव मनीचे उमजले रे
तू भाव भावनांचा भुकेला
गुढ हे अंतरीचे कळले रे

दयाघना, 
तुझा नामाचा रे मज
ऐसा लागावा छंद
विसर न व्हावा कधी
आळवीन नाम तुझे मुकूंद

पंढरीनाथा...
सुख दुःखाचा सागरी
तूच असावा सांगाती
योग सदा तुझा घडावा
दे प्रभो मज सन्मती!

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

ओल्या सांजवेळी!

सख्या ओल्या सांजवेळी  मन माझे हिंदोळ्यावर झुले  तू येण्याची चाहूल लागताच  हृदयी माझ्या वसंत फुले  सख्या ओल्या सांजवेळी  नजर माझी...