लेखन प्रकार-स्फुट लेखन
विषय-मन
आपण जीवन जगत असतांना
आपल्या आजूबाजूला सतत बरं-वाईट ,सुख-दु:ख,आनंद-क्लेश देणारं असं काहीतरी घडत असतं.त्यापैकी काही चांगल्या,काही वाईट घटना आपल्या मनावर नकळत कोरल्या जातात.त्यातून मनावरही बरे-वाईट घटनांचे जाळे तयार होऊन मन अस्थिर होते आणि मनात संघर्ष सुरू होतो.त्यावेळी हे ' मन ' नावाचं डोळ्यांना न दिसणारं इंद्रिय हाती धरुन ठेवावं तर तेही करता येत नाही.जलाशयात उठणा-या तरंगासारख,पा-यासारखं नाजूक-हाती न येणारं असं हे मन जीवाला स्वस्थता लाभू देत नाही.खान्देश कन्या बहिणाबाई चौधरी यांनाही प्रश्न पडला होताच की ! म्हणून तर त्या मनावर चिंतनशील काव्य लिहून गेल्या.
' मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर ।
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।
मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा । जशा वार्यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा ।।
मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन? । उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन ।। '
मनाच्या अशा गमजा विचारात घेऊन निराश होऊन शांत बसून नाही चालणार !
मग आपण काय करावे? तर...
सकारात्मक विचार करून जर आपण जीवनाची वाटचाल सुरू ठेवली तर आपल्या वाटेवर खूप आनंदाचे क्षण, समाधानाचा फुलांची पखरण आपल्याला अनुभवाला येते. " भरून पावलो देवा !" असे आनंदानुभूती देणारे उद्गार आपसूकच ओठांवर तरळू लागतात.
पण नकारात्मक विचारांचा बेडूक पाहत बसलो तर तो हळूहळू फुगत जातो.हे लक्षात घ्यावे. मनाला सदैव ताब्यात ठेवता आले पाहिजे.असे जर केले नाही तर...मनाच्या घोड्यावर राग नावाचा रिपू स्वार होतो आणि तो मोठ्या कष्टाने,प्रेमाने, जिव्हाळ्याने जीवनात जे जे काही चांगलं पेरुन ठेवलेलं असतं,त्या शेतीची नासधूस करीत सुटतो.म्हणूनच ' राग ' या स्वाराला मनाच्या अश्वाजवळ येऊच देऊ नये.त्यासाठी ' संयम ' नावाचा द्वारपाल जवळ बाळगावा.
थोडक्यात काय तर ... आपल्या ' मन ' रुपी अश्वावर आपलं पुर्णतः नियंत्रण असले पाहिजे.त्याला चौखूर उधळू न देता तोंडांत काटेरी लगाम लावता आली पाहिजे.निश्चयाच्या रिकिबीत पाय घट्ट रोवता आले पाहिजे. म्हणजे खाली पडण्याचा धोका ( अपमानित होण्याचा) निर्माण होणार नाही.
सोप्या शब्दात सांगायचे तर - प्रियजनहो,रागाच्या भरात,संयम विसरुन कोणताही लहान असो वा मोठा निर्णय घेऊ नका. राग आल्यावर चिडू नका ,तर काही वेळ डोळे घट्ट मिटून शांत बसून रहा.एक ते शंभर अंक बोलत रहा. आपल्या आवडत्या व्यक्तीशी संवाद साधा.आवडत्या फुलांचा सुगंध अनुभवा, परंतु अशा प्रसंगी मूग गिळून एकांतात गप्प बसणे ही कृती " हलाहल विष ' समान ठरु शकते.शेवट काय? तर स्वविनाश हा अटळच!
लक्षात ठेवा,तुमचं भलं करण्याचं प्रचंड सामर्थ्य फक्त तुमच्या मनात स्फुरणा-या सकारात्मक विचारात आहे.म्हणून काम,क्रोध, मद,मोह,मत्सर आणि मोह या षढ्रिपूंवर विजय मिळवायला शिका.
शांत,संयमी राहाल तर हमखास सुखसमृद्धी मिळवाल.
संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे की, मनासारखं दुसरं दैवत आपल्याला शोधून ही सापडणार नाही म्हणून ते म्हणतात-
मोकळे मन रसाळ वाणी | याची गुणीसंपन्न ||१||
लक्ष्मी ते ऐशा नावे | भाग्य ज्यावे नरी त्यांनी ||२||
नमन ते नम्रता अंगी | नेघे रंगी पालट ||३||
तुका म्हणे त्यांची नावे | घेता व्हावे संतोषी ||४||
इतुके सांगुन संत शिरोमणी तुकाराम महाराज थांबत नाही तर ते म्हणतात-
" मन करा रे प्रसन्न सर्व सिध्दीचे कारण !
मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते!"
म्हणून आपण आपले मन सदैव निर्मळ,निरोगी,निडर,निकोप ठेवू या ! सदैव प्रसन्नचित्त,आनंदी,राहू या !
माझ्या मनातही आता एक फुलपाखरू उडतयं ते असं...
मन फुलपाखरू
आठवणींच्या हिंदोळ्यावर
मन माझे वेडे झुलते रे !
क्षणात येते क्षणात जाते
फुलपाखरू होऊन भिरभिरते रे !
बालपणीच्या अल्लड वाटा
उनाड होऊन चालते रे !
बालपणीच्या तो काळ सुखाचा
कानी हळूच गुणगुणते रे !
निमिषार्धात घेऊन गिरकी
सप्तरंग जीवनाचे दाखवी रे!
सुख हर्षाच्या गंधकोषी
सख्यासवे गूज करते रे !
नाजूक लता ही संसाराची
हळवे होऊन जपते रे !
आठवणींच्या हिंदोळ्यावर
मन माझे वेडे झुलते रे !
🌹 शुभं भवतू 🌹
🙏 🌹जय जय पांडुरंग हरी 🌹🙏
©®सौ. पुष्पा पटेल "पुष्पम्".
मु.पो.म्हसावद.