Followers

रविवार, मार्च २७, २०२२

रे कन्हैया...!

कन्हैया...
आज प्यार का खुमार
मुझपे ऐसा छाया हैं वो
नाम तेरा गा रही हूं मैं
मनमोहना...बासुरी की धून तेरी है

बावरी हो के ढुॅंढ रही तुझे
उपवन उपवन जमुना तीर
प्यार की धून मोहे ऐसें
तेरे बिन ऑखसे बहे निर


©® पुष्पा पटेल " पुष्पम् ''

शुक्रवार, मार्च २५, २०२२

जाणता राजा: छत्रपती शिवाजी राजे!

महाराष्ट्राच्या इतिहासात तीनशे वर्षांनंतर…? होय…!
तीनशे वर्षांनंतरच एक शुभ वर्तमान घडले. कोणत्या शब्दात त्या सुवर्णक्षणाचे मोल सांगू? युगायुगांनीच असा शुभ क्षण निर्माण होतो.त्याचे मोल अनमोल! हा शुभ क्षण म्हणजे सह्याद्रीच्या गिरिकंदरात शिवनेरीवर आनंदाचा कल्लोळ उडाला.वाद्ये कडाडू लागली.संबळ,झांजा झणाणू लागल्या.गडावरच्या नगारखान्यात सनई चौघडा झडू लागला.नद्या,वारे,तारे,अग्नी,भूमी आनंदले.तो दिवस सोन्याचा!तो दिवस रत्नांचा ! तो दिवस कौस्तुभाचा ! तो दिवस अमृताचा ! हा क्षण गाठण्यासाठी शुभ-निमिषे गेली तीनशे वर्षे शिवनेरीच्या भवती घिरट्या घालीत होती.आज त्यांना नेमकी चाहूल लागली.तीनशे वर्षांनंतर! कोणत्या शब्दात त्या सुवर्णक्षणाचे मोल सांगू? हा शुभ क्षण म्हणजे सह्याद्रीच्या गिरिकंदरात जिजाऊसाहेबांच्या पोटी शिवाई देवीच्या कृपेने श्री शालिवाहनृपशके १५५१ फाल्गुन वद्य३,शुक्रवार,दि.१९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरीवर शिवाजी राजांचा जन्म झाला.
    जिजाऊंनी त्यांना बालपणातच स्वराज्याचे बाळकडू पाजून निडर बनवले. " बाळाचे पाय पाळण्यात दिसतात " ही उक्ती त्यांनी स्वकर्तृत्वाने खरी करून दाखवली.दक्षता, कणखरता आणि तत्परता असा स्थायीभाव असलेल्या शिवछत्रपतींच्या शब्दकोशात आळस नव्हता, उत्साह होता, निग्रह होता, ममता होती. त्यागवाद होता. अष्टपैलू, अष्टावधानीजागृत, आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, लोकहितदक्ष, धर्माभिमानी; पण परधर्मसहिष्णू, चारित्र्यसंपन्न, असा हा जाणता राजा आनंदनाम संवत्सरे, शालिवाहन शके १५९६,जेष्ठ शुद्ध १३, शनिवारी,उष:काली पाच वाजता सिंहासनाधीश्वर झाले.सिंहासनाधीश्वर शिवछत्रपती राजेंचा विजय असो ! एकच जयघोष निनादला.
 राजांना राजपद मिळाले तरी,त्यांच्यात तसुभरही गर्व निर्माण झाला नाही.स्त्रियांकडे पाहताना माता भगिनींची दृष्टी ठेवून स्त्रियांवर अत्याचार करणा-या पाटीलसारख्या नराधमाचे हात व पाय कलम करुन महिलांकडे वक्र नजरेने पाहाल तर गय केली जाणार नाही.हा सूचक संदेशच दिला.शत्रूच्या हल्ल्याची झळ रयतेला किंचितही पोहोचू नये, त्यासाठी महाराज सदैव दक्ष असत. कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची महाराज कधीही गय करीत नसत. सैनिकांनी कल्याणच्या सुभेदाराची सून महाराजांसमोर उभी केली असता,राजांनी तिला मातेसमान दर्जा देऊन साडीचा आहेर व पालखीत बसवून सुखरुप सुभेदाराकडे पाठविले.डॉ. बाळकृष्ण हे डच, पोर्तुगीज, ब्रिटिश साधनांच्या आधाराने शिवरायांबाबत सांगतात, ‘‘ शिवाजीराजांची नजर अत्यंत तीक्ष्ण होती. ते प्रत्येकाशी नेहमी स्मितहास्य करून बोलत.अडी अडचणी जाणून घेत.      
    राजाराम शास्त्री भागवत यांनी लिहिलेल्या चरित्रात ते म्हणतात, ‘‘ शत्रू पक्षातील जखमी व शरण आलेल्या सैनिकांवर शिवाजी महाराज औषधोपचार करून सुखरूप माघारी पाठवत असत.’’ शिवाजी महाराजांच्या कार्याचे, नीतिमूल्यांचे वर्णन देशी-विदेशी अभ्यासकांनी केलेले आहे. थोर शिवचरित्र अभ्यासक डॉ. बाळकृष्ण हे डच, पोर्तुगीज, ब्रिटिश साधनांच्या आधाराने शिवरायांबाबत सांगतात, ‘‘ शिवाजीराजांची नजर अत्यंत तीक्ष्ण होती. महाराज शूर, बुद्धिमान, मुत्सद्दी, लोककल्याणकारी आणि नीतिमान राजे होते. त्यांचा कार्यातिहास जसा शौर्याचा, धैर्याचा आहे, तसाच औदार्याचादेखील आहे. त्यांनी तलवार चालवली, रणांगण गाजविले, त्याचबरोबर आदर्श शासनप्रणालीचाही अवलंब केला. त्यांचे राज्य केवळ एका जातिधर्माचे नव्हते, तर गोरगरीब रयतेचे होते.म्हणून ते रयतेचे राजे ठरले.         ब्रिटिश चरित्रकार डेनिस किंकडे म्हणतात, ‘‘ छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे, हिंदूचेच नव्हे, तर सर्व भारतीयांचे, जगभरातील लोकांचे प्रेरणास्थान आहे.’’ शिवरायांनी आपल्या राज्यात कधीही भेदभाव केला नाही. त्याविषयी प्राच्यविद्यापंडित शरद पाटील म्हणतात, 
‘‘ शिवाजी महाराजांचे मोठेपण त्यांच्या समतावादी धोरणात आहे.’’ त्यांनी जातिभेद केला नाही, तसेच स्त्री-पुरुष असा भेदभावदेखील केला नाही. महिलांना नेहमीच आदर, सन्मान आणि त्यांना संधी देण्याचे कार्य त्यांनी केले. शिवचरित्राचे अभ्यासक लालजी पेंडसे म्हणतात, ‘‘शिवाजीराजे उपेक्षित, गोरगरीब वर्गाबाबत अत्यंत कनवाळू होते.’’ समाजात मजूर, कष्टकरी, शेतकरी, श्रमकरी आणि विशेषतः सर्व जातिधर्मांतील महिला कायमच उपेक्षित असतात, त्यांच्याबाबत शिवाजी महाराज सहृदयी होते.ते नेहमी चैतन्यशील कामात जलद आणि उत्साही असत. त्यांच्या राहणीमानात डामडौल नव्हता. ते विलासी जीवनापासून दूर राहिले. त्यांच्या छावणीत नर्तकी, मद्यालये आणि अमली पदार्थांवर कडक निर्बंध होते.’’ डॉ. बाळकृष्ण पुढे म्हणतात, ‘‘ शिवाजी महाराजांच्या राज्यात व परराज्यांतील मोहिमांमध्ये स्त्रियांना अत्यंत सन्मानाची वागणूक दिली जात असे,स्रियांना कैद करायला बंदी होती.’’ मोगली फौजेतील रायबाघीण शिवरायांच्या विरोधात उमरखिंडीत लढली. त्यात तिचा पराभव झाला. ती पकडली गेली, तेव्हा शिवाजीराजांनी तिला तिच्या हुद्यानुसार सन्मानाची वागणूक दिली. तिचा आदर-सत्कार करून तिला तिच्या छावणीत सुखरूप पोचविले.  दक्षिण दिग्विजयावरून स्वराज्यात परतत असताना कर्नाटकातील बेलवाडीच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई या शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढल्या. त्या वेळी सावित्रीबाईंचा अवमान करणाऱ्या स्वकीय सरदारांना शिवरायांनी शिक्षा केली. सावित्रीबाई देसाई यांचा सन्मान केला. त्यांच्या लहान बाळाला मांडीवर बसवून दूध पाजल्याचे शिल्प आजदेखील यादवाडला पाहावयास मिळते.कोणत्याही स्त्रीचा नखाला आणि केसालाही धक्का लागू नये  यासाठी दक्ष राहण्याची सैन्याला कडक तंबीच होती. राज्यात एकही जीवंत वृक्षाची नासधुस होणार नाही.शेतीची नासाडी होणार नाही,याची काळजी घेण्याची कडक ताकीद सैन्याला होती.
          छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात शिस्तबद्धता निर्माण केली. राजाराम शास्त्री भागवत यांनी लिहिलेल्या चरित्रात ते म्हणतात, ‘‘ शत्रू पक्षातील जखमी व शरण आलेल्या सैनिकांवर शिवाजी महाराज वेळप्रसंगी स्वतः लक्ष घालून औषधोपचार करून सुखरूप माघारी पाठवत असत.’’
     राजांनी जाणले होते की, स्त्रीसुद्धा बुद्धिमान आहे, हिंमतवान आहे, कर्तृत्वान आहे, यावर शिवरायांचा दृढ विश्‍वास होता. जिजाऊसाहेबांच्या सक्रिय सहभागातून हे त्यांनी जाणले होते. शिवाजीराजांच्या महिलाविषयक धोरणामुळेच नंतरच्या काळात संभाजी महाराजांच्या महाराणी येसूबाई, राजाराम महाराजांच्या महाराणी ताराराणी या स्वराज्याच्या रक्षणासाठी निर्भीडपणे पुढे आल्या. शिवरायांच्या सुनांनी हातात तलवार घेऊन घोड्यावर बसून रणांगण गाजविले, सिंहासनावर बसून राज्यकारभार केला. शिवाजीराजांच्या महिलाविषयक धोरणामुळेच हे शक्‍य झाले.
     शिवरायांचे माता-भगिनीविषयीचे द्रष्टेपण पाहता, मी तर म्हणेन की, आपण सर्वांनी मुलींच्या जन्माचे स्वागत करणे, त्यांना संधी देणे हे शिवकार्य ठरेल. राजकीय लढा चालूच राहील;यात दुमत होणे नाही, पण त्या राजकीय लढ्यातदेखील विरोधी बाजूच्या महिलांचा सन्मान करणे, हीच खरी शिवभक्ती ठरेल. शिवरायांचा हा आदर्श आजच्या राजकारणी मंडळींनी जरुर घ्यावा.
     छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनात अनेक जीवघेणे प्रसंग आले. पण तरीही त्यांनी नैतिकता कधीही सोडली नाही.दिलेरखान, शाहिस्तेखान, अफजलखान,औरंगजेब बरोबर संघर्ष केला. पण त्यांच्याही महिलांचा शिवराजांनी आदरच केला.एवढेच नव्हे तर अफजलखानाच्या वधानंतर त्याच्या धर्मानुसार प्रतापगडावर विधी पार पाडला.राजेंनी न्यायदान करतांना नि:स्पृहता दर्शविली, गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुलाहिजा न ठेवता समज दिली. पश्चातापदग्ध होऊन परतलेल्या वतनदारांना अभयदान दिले. सर्व धर्मांना समान लेखले. साधुसंताचा यथोचित आदर केला. रयतेला त्यांनी लेकरांप्रमाणे मानले. आपल्या प्रजेवर, अधिकाऱ्यांवर, सैनिकांवर, वतनदारांवर, साधुसंतावर विलक्षण प्रेम करणारा असा हा जाणता राजा  युगायुगात एकदाच जन्माला येतो.असे इतिहास अभ्यासक सर जदुनाथ सरकार म्हणतात.
हिंदवी स्वराज्य निर्माता छत्रपती शिवाजीराजेंना माझा…
🌹🙏🙏🙏त्रिवार मानाचा मुजरा !🙏🙏🙏🌹

©® सौ.पुष्पा पटेल " पुष्पम्
म्हसावद,जि.नंदुरबार

बुधवार, मार्च २३, २०२२

आई!

नऊ महिने पोटी माझं ओझं
घेऊन वावरलीस तू आई !
तुझ्या माया- ममत्वाला 
त्रिभूवनी तरी उपमाच नाही
 
तुझ्या आईपणाचा देवालाही हेवा
देवही म्हणे मी होईन आई
युगे अठ्ठावीस पंढरपुरी
कर कटेवरी घेऊन झाला विठाई

आई तुझ्या प्रेमाची ओंजळ 
सरता सरत नाही
किती सांगू तुझी महती 
शब्दात मावत नाही 

तुझा त्याग आणि समर्पणाला 
मी जन्मभरी कृतज्ञ आई !

©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"

शनिवार, मार्च १९, २०२२

दक्ष रहा



सणांचा निमित्ताने 
खाऊ नका भांगेची गोळी
व्यसन तेही एक  
करी सुविचारांची होळी

वेळीच दक्ष रहा
आवर घाला हो मनाला
निर्व्यसनाशी दोस्ती
सौंदर्य देई जीवनाला!

©® सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"

गुरुवार, मार्च १७, २०२२

एक दिवस हवा!

हवा आहे मला एक दिवस स्वतःसाठी
नकोय कसले ओझे माझ्या पाठी
करेन आराम,जाईल मस्त सिनेमाला
जगून तर बघू एक दिवस स्वतःसाठी

एकदिवस कामांना मारेल मी दांडी
मस्त हूंदडून खाईल चटपटीत पाणीपुरी
मैत्रीणींशी गप्पा अन् मनमुराद हसणं
आठवणीत रमून इच्छा होईल पुरी

असा हा मस्त दिवस जगायचाय मला
देवा होईल का रे पूर्ण माझी इच्छा 
तूच कर काहीतरी अन् सोडव पिच्छा
तूच माझा मायबाप दे एक दिवस मज आनंदाचा!

©® सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"

मंगळवार, मार्च १५, २०२२

खरा धर्म!

दुसऱ्यांचा आनंदात माना आनंद

हृदयग्रंथी लिहीत जावे एकेक पर्व

रेऽऽ मनवा जैसी करणी वैसी भरणी

प्रेम अर्पावे सकला हाच खरा धर्म !


यशस्वी जीवनाचा महा मूलमंत्र

निरपेक्ष  भावनेने  करावे  कर्म

प्रामाणिकपणा, आनंद, समाधान

हेच खरे यशस्वी जीवनाचे मर्म !


©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"

गुरुवार, मार्च १०, २०२२

क्रांतीज्योती सावित्रीबाई !


सावित्री...तू नंदादिपातली वाती
तेजाळली दशदिशी अखंड ज्ञानज्योती

तूच दिला आम्हा एक महामंत्र…!
लढेन मी ! पण मिळविन विद्यातंत्र 

तुझ्या मुखी वदली संकल्पसिद्धी 
केले सज्ञान मज होते मी मंदबुद्धी

तू तोडीली बेडी आमुच्या पायीची 
रांधा वाढा उष्टी काढा परंपरांची

तूच श्वेतवस्रा सरस्वतीदेवी माझी
वंदिन चरण गाईन आरती तुझी 

ज्ञानदेव जमविला वारकरी पंढरी
दिनदुबळ्या लेकींची तू झाली वैखरी

तू दिल्या बळे घेते मी नभी भरारी
सुविचारांचे तोरण बांधिले मी दारी

मी आहे खंबीर उभी समस्त क्षेत्री
कृतज्ञ मी तुज क्रांतीज्योती सावित्री

©® पुष्पा पटेल " पुष्पम् "

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल