Followers

रविवार, ऑक्टोबर ०९, २०२२

कोजागिरी पौर्णिमा

शरद्पौर्णिमेच्या चांदण्यात 
मी घेतली लेखणी हाती
आनंद वाटे मजला आज 
सारं  विश्व  आज सोबती 

ता-यांचा झुल्यावर आज
चांदोबा   बघा   विराजले
क्षिरपात्र  भासे मज जणू
अमृत  घट  घेऊन  आले
  
निळ्या नभीचे चंद्र किरण
केशरयुक्त  दुधात  न्हाती
वाटे  चांदण्यांचा संगतीने
कृष्ण राधा रास खेळती !

समृध्दीचा आशिष देऊन
निघाली कोजागिरी निशा
सुख समृद्धी वस्र लेऊन
पहा उजाडल्या दशदिशा !

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम् "

बुधवार, सप्टेंबर २८, २०२२

वाफाळलेला चहा

अहो...एक कप चहा
वाफाळलेला...
घोटभर का असेना 
पिऊन तर पहा !

अंगाची हुडहुडी
करण्यासाठी दूर 
फुर्रऽऽकन प्या...
उबदारपणासाठी चहा !

स्फूर्ती येईल प्यायल्याने 
दिवसाची गोड सुरुवात
 चहाने हो होईल
तन-मन आनंददायी पहा...!

डोकेदुखी असो की चक्कर 
चहा घेता होई छुऽमंतर 
अशी जादू न्यारी
दाखवी एक कप चहा !

आपुलकी वाढवितो
माणसा माणसात 
गोडी वाढवतो जनमानसात
 त्यास मोठ्ठा मान अऽहा!

वाटू लागता कंटाळवाणे
चहा प्यावासा वाटे
गप्पांच्या मैफलीत 
वासाने स्फूर्ती देतो चहा
 
प्रीतिची हाक ऐकता
मन जेव्हा सैरभैर होते
मिलनाची तृष्णा शांतवी
हॉटेलच्या टेबलावर चहा!
 
पै-पाहुणे येता घरा
स्वागता चहापान
प्रेमाने गातो आबालवृद्ध 
चहाचे गुणगान 

प्रेमाचं प्रतीक आहे 
फक्त एक कप चहा
पिऊन झाल्यावर मिळवतो
 प्रियकराची वाहऽऽवाऽ !

चहाच्या वाफेसारखे 
सुख दुःख उडवून द्यावे
गोडवा ठेवून आपल्या मनात
जीवनगाणे आनंदाने गावे !

©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम् "

शुक्रवार, ऑगस्ट २६, २०२२

बैल पोळा

सर्जा राजाची जोडी
बघा सजली अंगणी
श्रावणात सण आला
बैल पोळा म्हणूनी

वर्षातुन एक दिवस
बैलांचा ह्या सणाला
बळीराजा करी कृतज्ञता
श्रावण अमावास्येला

झुल घालून अंगावर
बैलांना सुंदर सजवतो
रंगवून दोन्ही शिंगांना 
फुगे गोंडे त्यांना बांधतो

नैवेद्य करतो आज खास
खीर अन् पुरणपोळीचा
घास अमृताचा भरवतो तेव्हा
आनंद बघावा बळीराजाचा

असा हा मित्र शेतकऱ्यांचा
राबतो वर्षभर निष्ठेने
उभ्या जगाचा पोशिंदा
जीवन जगतो कष्टाने

©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम्" 
   म्हसावद जि नंदुरबार

शुक्रवार, ऑगस्ट १९, २०२२

बासरी मनमोहनाची

🌷🌷🌷जीवलग गृप अंतर्गत आजचा विषय-बासुरी मनमोहनाची...!
विषय सुचक-सौ पुष्पा पटेल "पुष्पम्" अर्थात मीच स्वतः🌷🌷🌷

    बासरी...पावा ! हे भगवान् श्रीकृष्णाच्या हातात शोभणारे एक लोभस वाद्य. भल्या भल्यांना वेड लावणारे...! कन्हैयाच्या बासरीचे सूर उमटावेत आणि गोपिकांनीच काय गाई-वासरांनीही देहभान विसरून जावं इतकी ह्या बासरीची किमया अगाध...!
श्रीकृष्णाच्या मनमोहक बासरीला जाणून घेण्यासाठी आधी आपल्याला ती बासरी श्रीकृष्णाच्या हातात कशी आली ते पाहणे अधिक रंजक ठरेल.         
    द्वापारयुगाच्या काळात भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीवर अवतार घेतला असता त्यांना भेटायला देवी देवता वेळोवेळी पृथ्वीवर येत असत.भगवान श्रीशंकरजींनी पाहिले की आपणही श्रीकृष्णांना भेटायला जावे. पण,भेटायला जातांना रिकाम्या हातांनी जाणे योग्य ठरणार नाही .हा मनात विचार येताच श्रीशंकर थांबले. काय बरे घेऊन जावे श्रीकृष्णांना भेट देण्यासाठी आपण ? अशी एखादी वस्तू न्यावी की जी भगवंतांना अतिशय प्रिय वाटेल, आणि ती कधीही सोडायच्या मोह त्यांना होणार नाही .श्री शंकरजींनी खूप विचार केला. हाऽऽ आठवले तर ! त्यांच्याजवळ दधिची ऋषीचे एक हाड पडून होते. दधिची ऋषी हे महान ऋषी होत. त्यांनी देव दानवांच्या युद्धात दानवांवर देवांना विजय प्राप्त करता यावा यासाठी आपले संपूर्ण शरीर इंद्राला दान दिलेले होते. त्याच दधिचीच्या हाडाने वज्रनामक आयुध बनविण्यात आले होते. नंतर उरलेली जी काही हाडं होती ,त्यातून विश्वकर्माने तीन प्रकारचे धनुष्य बनवले एक पिनाक धनुष्य, दुसरं गांडीव धनुष्य, आणि तिसरे शारंग धनुष्य. शंकरजींनी ते उरलेले एक हाड हाती घेतले. त्याला घासून योग्य असा आकार दिला , आणि अत्यंत सुंदर मनमोहक अशी एक बासुरी तयार झाली.श्री शंकरजी ती सुंदर बासुरी घेऊन श्रीकृष्णांच्या भेटीला निघाले. भगवंत तेव्हा गोकुळात होते.गोकुळात जाऊन त्यांनी श्रीकृष्णांना स्वहस्ते तयार केलेली ती बासुरी प्रेमभराने सुपूर्द केली . भगवान श्रीकृष्ण अत्यंत आनंदित झाले आणि श्रीशंकरजींनी आपल्यासाठी आणलेली ही खूप अनमोल भेट आहे असे आनंद्गोगार काढले.
म्हणाले, महादेव...आपण आणलेली ही भेट अद्भूत अशी आहे. आपण दिलेली ही अनमोल भेट मी या अवतारात तरी विसरणार नाही.ही बासुरी एक क्षणभरही मी कधीही माझ्यापासून दूर करणार नाही. असे आश्वासन दिले.
कन्हैयाने आपल्या पूर्ण अवतार कार्यात ती बासरी अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या हाती ठेवली.
अशी ही बासरी श्रीकृष्णाची मोहक बासरी झाली. बासरी आणि श्रीकृष्ण हे नातं अतूट झाले.
    श्रीकृष्ण ती बासरी ओठांना लावून जेव्हा वाजवत असत तेव्हा त्या बासरीचे सूर चराचरातील यच्चयावत घटकांना मोहित करीत असत.असे म्हटले जाते की, श्रीकृष्ण यमुनेच्या काठी गाई घेऊन जात.सोबत गोपाळ असत. जेव्हा ते बासरी वाजवत तेव्हा खळाळणारे यमुनेचे पाणी सुद्धा मंत्रमुग्ध होऊन वाहणे थांबत असे. गाई गुरे वासरे सर्व बासरीचे सूर ऐकताच कदंबाच्या झाडाखाली बेभान होऊन गोळा होऊ लागत.कदंबवनातील पशू,पक्षी, श्रीकृष्णाच्या आजूबाजूला येऊन बसत असत. कदंब वनातील मोर बासरीच्या सुरांनी मुग्ध होऊन आपला पिसारा फुलवून थुईथुई मनमोहक नृत्य करू लागत. वृक्ष वेलीचे थरथरणे सुरांनी मोहित होऊन बंद होई. ज्या ज्या नरनारींच्या कानी बासरीचे सूर पडत त्यांची तहानभूक विसरली जात असे.गोकुळातील गवळणी हातातील काम धंदा सोडून,खाणे-पिणे सोडून भान हरपून कृष्ण भेटीला निघत.पौर्णिमेच्या रात्री यमुनेच्या काठी बासुरीच्या सुरांनी मोहित होऊन चंद्र,तारे उंच आभाळी जागच्या जागी स्तब्ध होत असे.राधिकेला भेटीची हुरहूर दाटून लागले.तीला कृष्ण भेटीची उत्कंठा दाटून ती बावरी होई. आकाशातून वर्षाव करणाऱ्या मेघांच्या धारांचे कोसळणे बंद होई. 
अशी अगाध मोहिनी श्रीकृष्णाच्या बासरीची होती. गोपिकांना तर या बासरीने अक्षरशः वेड लावले होते. कृष्णाची बासरी वाजावी व कृष्णाच्या बासरीतून सूर निघावे, आणि गोपिकांनी त्या सुरांनी मोहित होऊन श्रीकृष्णाच्या भेटीला धावत येऊ नये असे कधी झालेच नाही, आणि ज्या दिवशी श्रीकृष्णाची बासरी वाजली नाही तिचे सूर कानी आले नाही त्या विरहाने सुद्धा गोकुळातील गोपिका वेड्या होत.अशा या बासरीचे अमोघ वर्णन करता येईल.या बासरीच्या सुरांनीच राधा श्रीकृष्ण यांच्यात प्रेमबंध जुळला होता. गोपिकांना वाटे की श्रीकृष्णाने आपल्याजवळ जास्त वेळ खेळावे, आपल्याजवळ जास्त थांबावे ...पण तो बासरीशी जितका खेळतो तेवढा आपल्याशी का खेळत नाही?अर्थात् ती बासरीची किमया की कन्हैयाची हे सांगणं अवघडच...! याविषयी एक कथा सांगितली जाते... 
 कृष्णाचं आपल्यावर नव्हे तर बासरीवर सर्वात अधिक प्रेम आहे हे जाणून गोपिका बासरीवर चिडून असायच्या. एकदा त्यांनी बासरीलाच विचारलंच की,अग बासुरी... आम्ही असताना कन्हैयाचं तुझ्यावर इतकं प्रेम कसं? तर बासुरीने सुंदर उत्तर दिलं की, मला एकूण सात छिद्रं आहेत. त्यातल्या ६ छिद्रांतून षड्रिपू ( काम, क्रोध,मद,
मोह,लोभ, मत्सर,)केव्हाच 
बाहेर गेलेले आहेत. सातवे छिद्र म्हणजेच माझे (बासुरीचे) मुखरंध्र, तिथून केवळ कन्हैयाने फुंकर मारली तरच सूर निघतो.(आवाज येतो) म्हणजे मला स्वतःचा आवाज नाही. म्हणूनच मला अहंकारही नाहीच. म्हणूनच कन्हैयाला मी जास्त जवळची आहे. हे ऐकून गोपींचा अजूनच जळफळाट झाला.आणि त्या स्वतःला बासुरी बनून घेण्याचा प्रयत्न करु लागल्या.अशी ही बासुरी मनमोहक मनमोहनाची!
🙏🌹 जय राधे कृष्ण !🌹🙏

🌷🌷जीवलग सारखा गृप असावा🌷🌷
🌷🌷प्रेम जिव्हाळा मनी वसावा🌷🌷

©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम्"

लेखकाचं जीवन

लेखकाचं जीवन म्हणजे...
वसंतात बहरलेला पुष्पपिसारा
नव्या पालवीचा प्रसन्न नजारा
निराश मनाला प्रेरक इशारा
कोरड्या मृदेला धुंदगंध देणारी 
पहिल्या पावसाची धारा ! 
मरगळलेल्या विचारांना
उभारी देणारा वारा
आयुष्य सुंदर आहे ते आनंदाने जगावे!
हे सांगणारा महान नारा
नर अच्छा कर्म करे सो...
नारायण हो जाय!हा मंत्र घोष प्यारा 
कधी शब्दांची करुनी फुले
सुगंधित करतो दुनिया
कधी शब्दांची करुनी शस्त्रे
दाखवी दुनिया बदलण्याची किमया!
कल्पनेचे लावून पंख
पाहतो दशदिशांची सृष्टी
जे न देखे रवि ते देखे लेखक कवी
लेखणीतून करतो शब्दमोत्यांची वृष्टी
साहित्याचा पदपथावर...चालतो 
साहित्य शारदेचा होऊन पथिक
रामायण महाभारत गीता ग्रंथ... 
कथा कविता कादंबरी लेखनातून पेरतो विचार नैतिक
बालगीतातून बागडतो...
आनंदाचा नंदनवणी
लेखकच जगतो होऊन 
साहित्य सरितेचा धनी !


©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम्"


गुरुवार, ऑगस्ट ११, २०२२

रक्षाबंधन



भाऊ माझा सदा पाठीराखा
सुखदुःखात होतो वाटेकरी
सावली सारखी सोबत त्याची
राखी,भाऊबीजेचा तो मानकरी 

देवा प्रार्थना करीते मी तुजला
दे आयुरारोग्य माझा भावाला
द्यावा तू प्रेमभावे आशीर्वाद
त्याचा कष्ट आणि कर्तृत्वाला !

©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम् "

रविवार, ऑगस्ट ०७, २०२२

बालपणीची मैत्रीण

आयुष्याचा प्रत्येक टप्प्यात
नविन मैत्रीणींची साथ आगळी
पण् बालपणीचा मैत्रीणींची
गंमत असते बरं जगावेगळी

मैत्रीचा सुगंध दरवळे
आसमंती चोहीकडे
भातुकलीचा खेळ अन्
लुटूपुटूची भांडणे गं गडे

क्षणात रुसवे क्षणात दोस्ती
एकाच चाॅकलेटचे करी दोन तुकडे
जीवाला असते जीव देणारी
आनंदी आनंद जिकडे तिकडे

आठवण येता बालपणीची
जाई मन माझे हो माहेरा
अक्षय तृतीयेचा झोपाळ्यावर
झोका घेऊन परत येई त्वरा !

©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम्"


देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल