Followers

शनिवार, जानेवारी २२, २०२२

रुक्मीणीपती

रुक्मीणीपती
देवा,कृपाळा पांडुरंगा !🙏
भाव तव मनीचे उमजले रे
तू भाव भावनांचा भुकेला
गुढ हे अंतरीचे कळले रे

दयाघना, 
तुझा नामाचा रे मज
ऐसा लागावा छंद
विसर न व्हावा कधी
आळवीन नाम तुझे मुकूंद

पंढरीनाथा...
सुख दुःखाचा सागरी
तूच असावा सांगाती
योग सदा तुझा घडावा
दे प्रभो मज सन्मती!

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

गुरुवार, जानेवारी २०, २०२२

काव्यलेखन

काव्यलेखन

 आपण शिकूया काव्यप्रकार
आज आपण अष्टाक्षरी काव्यरचना करुया.
चला तर बघूया याचे नियम. हा काव्यप्रकार खूप सोप्पा असतो.


1) प्रत्येक ओळीत आठ अक्षरे असतात,
2) चार ओळीचं एक कडवं...
3) प्रत्येक कडव्यात दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत यमक साधावा.
4) प्रत्येक ओळीत पहिला शब्द हा सम असावा... म्हणजे दोन चार सहा अक्षरी
5) कडवेही सम संख्येत असतात. चार कडवे,सहा कडवे, आठ कडवे अशी रचना असते.
उदाहरणार्थ आपण येथे एक कविता लिहून समजून घेऊ!

लेखन प्रकार- अष्टाक्षरी काव्य
* शुभ वेळ *
कर्म  असता  चांगले
वेळ  येई   समाधानी
होई   प्रगती  निश्चित
तीच असे सत्य वाणी

कार्य  कराया मिळते
संधी हो फक्त एकदा
टाळू नये तीला कधी
घ्यावा सदैव  फायदा

हवी   असेल  प्रगती
खूप   मेहनत    करा
दारी     येई अनुभवा
रोज  दिवाळी दसरा

शुभ   वेळ  देतसे हो
काम  करायला बळ
मोती मिळे सागरात
मारा बुडी शोधा तळ

©® पुष्पा पटेल " पुष्पम् "
मु.म्हसावद,ता.शहादा,जि.नंदुरबार
तर मग समजला  न् अष्टाक्षरी काव्यप्रकार

मंगळवार, जानेवारी १८, २०२२

गोड ते बालपण

सखींनो...!
ती वेळ होती खूपच छान 
नव्हती आपल्याला कसली जाण
खेळताना पडावं,पडल्यावर रडावं
रडता रडता इकडं तिकडं हिरमुसून पहावं
उठावं ! पुन्हा रमावं...नसे हो भान
किती किती होती ती वेळ छान
जगण्यात आनंद होता 
अन् कधी कधी आपण करायचो
एकमेकीत धुमशान !
तेव्हा आपल्यात व्हायची कट्टी !
दोन दिवस जात नाही 
लगेच व्हायची पुन्हा बट्टी (मैत्री)
हे असं मस्त होतं आपलं जीवन
किती गोड गोड होतं न् सखींनो !
आपलं ते बालपण ...?
उत्तर एकच " अप्रतिम !"

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

रविवार, जानेवारी १६, २०२२

विसरु कशी मी !


गोड स्वप्न पाहिले मी आयुष्याचे
वादळाशी संघर्ष विसरले नाही

आसक्त झाले गुलाबपुष्पावरी मी 
काट्याचे भान विसरले नाही

शिखरावर नाव कोरले आज मी
ऊन-पावसाची संगत विसरले नाही

प्रसन्न वदने याची डोळा पाहिले मी
राधा-मिरेची निर्व्याज भक्ती विसरले नाही


©® पुष्पा पटेल " पुष्पम् "

शनिवार, जानेवारी १५, २०२२

पहाटपुष्प

अस्तित्वाचा शोध घेतांना
खाचखळग्याची वाट तुडवतांना
अवचित लाभला तुझा हात
विखुरलेल्या स्वप्नांची पानं
धुंडाळतांना तूच दिली मज
आपुलकीची दाद !
जीवन खूप सुंदर आहे
तूच तर समजावले मला !
जन्म-मरणाचे उकलून राज
केलाय मी संकल्प...
तुझ्याच पाऊलावर पाय ठेऊन
चढते-उतरतेय मी तुझ्यासवे
निर्धाराने सुख-दुखाच्या घाट 
मनात पेटवून घेतलाय मी
एक आशेचा दिवा...
हाती घेऊन चालतेय मी
आयुष्याची वाट 
सख्या ! विश्वास आहे मला 
तुझ्या सहवासात गवसेल 
मला प्रकाशदिशेला नेणारी पहाट!

 ©® पुष्पा पटेल " पुष्पम् "

शुक्रवार, जानेवारी १४, २०२२

मकरसंक्रांती

तिळाची स्निग्धता 
गोडवा गुळ-साखरेचा 
घेऊन आला सण मकरसंक्राती
विसरा जुने  राग द्वेष अन् क्लेश
धागा गुंफू स्नेह सौख्याचा !
जोपासू आपुलकीची नाती
मनामनात उजळू दे प्रभो !
शुभ मंगलदायक शब्द तेजाचीज्योती!!!

आनंददायी मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा!

©® पुष्पा पटेल " पुष्पम् "

बुधवार, जानेवारी १२, २०२२

राजमाता जिजाऊ


आऊ! तू होतीस म्हणून
उजाडली विश्वासाची पहाट 
शिवरायांना जन्म देऊन
मांडला स्वराज्याचा थाट

अनंत यातना सोसल्या
परी हार न मानिली आई
स्वराज्याचे बाळकडू पाजून
पेटवली ज्योती राजांचा हृदयी 


तूच घडविला मॉंसाहेब
एकेक श्वासासवे महा इतिहास
शब्दच झाले खड्ग तुझे
केला जुलमी सत्तेच्या -हास

घडविला तू जाणता राजा
अलौकिक शिकवण देऊन
त्रिवार वंदन जिजाऊ तुजला
आज मानाचा मुजरा करुन
         🙏🌹🙏

©® पुष्पा पटेल " पुष्पम् "

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल