Followers

मंगळवार, ऑक्टोबर २५, २०२२

दिपोत्सव (अष्टाक्षरी)

दिपोत्सव  आनंदाचा
तेजोमय   प्रकाशाचा
करु  साजरा   आनंदे
सण  महा मांगल्याचा

दिपोत्सव  आनंदाचा
करु दिव्यांची आरास
लावू  आकाशकंदील 
शोभा आणुया  घरास

आला  प्रथम  दिवस
संगे   हो   वसूबारस 
गोवत्साला   भरवूया
गवार  भाकरी  घास

येता      धनत्रयोदशी 
पुजा   धन   धन्वंतरी
आयुर्रोग्य लाभे सर्वा
तेज    पसरे    अंतरी

येता    नर्क   चतुर्दशी 
प्रातः हो अभ्यंगस्नान 
सडा  टाकता अंगणी
शोभे रांगोळीही छान 

करीता    लक्ष्मीपूजन
वाढे   गृहलक्ष्मी  मान
धूपदिप        नैवेद्याने
करु  वही  पूजा  छान

प्रिय  दिवाळी  पाडवा 
गृह  स्वामीचे  औक्षण
मिळे प्रेम स्नेह सौख्य
लाभे सौभाग्याचा दिन

भाऊबीज   आनंदाची
बंध   रेशमाचे    अतुट 
ओवाळीता   बंधुराजा
जुळे नाते   हो  अवीट

©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम्"

मंगळवार, ऑक्टोबर ११, २०२२

आई, घे ना गं उसंत !

आई तू  घे ना उसंत थोडी
आता नको ना करु ग् कष्ट !
आता तरी जग स्वतःसाठी  
आरोग्याला आहे वेळ इष्ट

भल्या पहाटे उठून सारे
काम हातावेगळे करते
कधीतरी निवांत बसून
घे मज्जा बघ कसे वाटते

जीवाला जीव लावणारी ग् 
आई माणसं तू  जमवली
राग लोभ मनी न ठेवता
ऋणानुबंधात ती बांधली

सगळ्यांचं सगळं केलं तू
दुःख संकटे सारे झेलले
आई तरी तुझ्या मुखातून
अमृताचे   झरे   पाझरले

आई  अनंत माया ममता 
सदैव   करते   पिल्लांवर
एकदा   तरी  करुन  बघ 
प्रेम तुझे  तू  ग  स्वतःवर

©® सौ पुष्पा पटेल "पुष्पम् "

रविवार, ऑक्टोबर ०९, २०२२

कोजागिरी पौर्णिमा

शरद्पौर्णिमेच्या चांदण्यात 
मी घेतली लेखणी हाती
आनंद वाटे मजला आज 
सारं  विश्व  आज सोबती 

ता-यांचा झुल्यावर आज
चांदोबा   बघा   विराजले
क्षिरपात्र  भासे मज जणू
अमृत  घट  घेऊन  आले
  
निळ्या नभीचे चंद्र किरण
केशरयुक्त  दुधात  न्हाती
वाटे  चांदण्यांचा संगतीने
कृष्ण राधा रास खेळती !

समृध्दीचा आशिष देऊन
निघाली कोजागिरी निशा
सुख समृद्धी वस्र लेऊन
पहा उजाडल्या दशदिशा !

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम् "

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल